पालघर : पालघर मधील झडपोली येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेमार्फत कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. पाच हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक, शांताराम मोरे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार श्रीनिवास वनगा यांनी पारितोषिक वितरणाला उपस्थिती लावली.
शहरी खेळाडूंप्रमाणेच ग्रामीण भागातील स्पर्धकांनाही वाव मिळावा म्हणून मागील सात वर्षांपासून जिजाऊ संस्थेकडून वर्षां मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येतं.
पालघर मधील झाडपोली येथे आज सातव्या वर्षी कोकण वर्षा मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. जवळपास पाच हजार स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला असून यावेळी आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांचं सादरीकरण करण्यात आलं. या मॅरेथॉनचं प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केलं असून या स्पर्धामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळत असल्याचही पाहुण्यांकडून सांगण्यात आलं. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
श्रीकांत शिंदे म्हणाले, "त्यांना आता काही बोलण्यासारखं उरलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे काही विशेष नाही. सतत तेच तेच बोलतात. त्यामुळे माध्यमे देखील त्यांना आता बाजूला करत चालली आहेत. अडीच वर्षात त्यांनी काय केलं याचा लेखाजोखा जनतेकडे आहे. त्यामुळे त्यांनी आता टीकाटिप्पणी बंद केली पाहिजे."
दहीहंडीला जसा खेळाचा दर्जा दिला तसेच काही निर्णय खेळाडूंच्या बाबतीत घेतले जातील आणि त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न केले जातील, असे देखील श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी यावेळी राज्यातील प्रत्येक भागात खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे क्रीडांगण आणि इतर सर्व सोयी सुविधा सरकारकडून केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था कायम असे स्तुत्य उपक्रम राबवून कोकणामधील सर्वच खेळाडूंना चांगला दर्जा निर्माण करून देईल आणि कोणत्याही पद्धतीने राजकारण न करता कोकणातील प्रतेक विद्यार्थी चांगला घडला पाहिजे आणि अधिकारी पदापर्यंत पोहोचला पाहिजे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खेळाडू चांगले बनवून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी जिजाऊ संघटना प्रयत्नशील आहे, पालघर जिल्ह्यातील प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याची मान नेहमी खाली गेलेली पाहायला मिळते त्यामुळे राजकारण सोडून जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असं मत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केलं