संगमनेर : संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात अवयदान चळवळीबाबत उदासीनता असताना सिन्नर तालुक्यातील दापूर गावातील आव्हाड कुटुंबीयांनी मात्र मुलाचे लग्नाचे औचित्य साधत अवयदान जनजगृतीसाठी या लग्न सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींना अवयवदानाचा अर्ज भरून हा वेगळा आहेर द्या असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून वऱ्हाडी मंडळींनी 102 अवयदानाचे अर्ज भरून हा आहेर दिला आहे. या अशा पद्धतीने अवयवदानाची जनजागृती झाल्यास अवयवदान चळवळीस मोठे बळ प्राप्त होईल. या अशा आदर्श कृतीमुळे आपल्याकडे अनेक वर्ष अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या नवीन व्यक्तींना जीवनदान मिळू शकते.
नरेंद्र आव्हाड (27)आणि दीपाली नागरे (22) या दाम्पत्याचा विवाह सोहळा संगमनेर येथील वसंत लॉन्स या ठिकाणी पार पडला. यावेळी वराचे वडील सुभाष आव्हाड यांनी त्यांच्या दापूर गावात आणि संगमनेर येथील हॉलच्या बाहेर मोठे फ्लेक्स लावून लावून या विवाह सोहळ्यात अवयवदानाचा संकल्प करण्यात येणार असून वऱ्हाडी मंडळींनी अवयवदानचा अर्ज भरून द्यावा हाच आमच्यासाठी आहेर असल्याचे जाहीर केले होते. त्याला उत्तम असा प्रतिसाद वऱ्हाडी आणि मित्र मंडळींनी दिली.
अवयवदानाचे अर्ज भरण्यासाठी आव्हाड कुटुंबीयांनी मुंबई येथील केईएम रुग्णालयातील राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्था (स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन - सोटो ) या अवयदानाचे काम बघणाऱ्या संस्थेकडून अर्ज घेतले. अर्ज कसे भरायचे याची माहिती जाणून घेतली.
याबाबत अधिक माहिती देताना, वराचा लहान भाऊ दिनेश आव्हाड यांनी सांगितले की, "गेली अनेक वर्ष अवयदान चळवळी बाबत अनेक वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांवर अनेक गोष्टी माहिती वाचत आलो आहे. अवयदान चळवळीबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. खरी तर अवयवदान करणे काळाची गरज आहे मात्र त्याबाबत आपल्याकडे आजही फारसे बोलले जात नाही. त्यामुळे आम्ही लग्नामध्ये या अशा पद्धतीने अवयवदान अर्ज भरून घेण्याचे निश्चित केले. विशेष म्हणजे काही उत्साही मंडळींनी अवयदान काय असते कशा पद्धतीने होते याची माहिती विचारली, त्यातच आमचा उद्देश सफल झाला. आज काही लोकांनी येथे अवयदानाचे अर्ज भरले मात्र भविष्यात ते नक्की या विषावर विचार करतील अशी मला आशा आहे."
राज्यातही अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. अवयवदानासारख्या महत्त्वपूर्ण कार्यात सहभागी होऊन गरजवंत व्यक्तींना अवयव देऊन त्यारूपाने जिवंत राहू शकता येते . मेंदूमृत व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय शास्त्राच्या साहाय्याने ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकता. मेंदूमृत व्यक्ती 2 किडन्या,1 लिव्हर, 1 स्वादुपिंड, 1 छोटे आतडे, 2 डोळे, 1 हृदय, 1 फुफ्फुस, त्वचा या गोष्टी दान करू शकतात.
सध्या महाराष्ट्र राज्यात, राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्थेच्या माहितीनुसार, राज्यात मोठी प्रतीक्षा यादी असून ते अवयव मिळावेत म्हणून नागरिकांनी निंदणी करून ठेवली आहे. त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे, किडनी - 5374, लिव्हर - 1194, हृदय - 101, फुफ्फुस - 21, स्वादुपिंड - 53, छोटे आतडे - 5, त्याचा प्रमाणे आता हाताचे प्रत्यारोपण मुंबईत सुरु झाले असून हातासाठी काही जण प्रतीक्षेत आहेत.
या विवाहसोहळ्याप्रसंगी पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी सर्व उपस्थितांना अवयवादांना संदर्भात मार्गदशन केले. तसेच पुणे येथील KEM रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ स्वप्नील कुलकर्णी आणि अन्य अवयदान क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आव्हाड आणि नागरे कुटुंबीयांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. या माध्यमातून अवयदान चळवळीस बळ मिळेल आणि भविष्यात लग्न समारंभ तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमात अशा पद्धतीने नागरिकांना आवाहन करून अवयदानाचे महत्तव पटवून दिले पाहिजे, असे डोनर फॉर इंडिया फाऊंडेशनचे संचालक डॉ ऋषिकेश आंधळकर यांनी सांगितले.