परभणी : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अनेक कामधंदे, व्यवसाय बंद असून लोक आपापल्या घारंमध्ये बंद आहे. अशातच परभणीतील एका हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल 11 प्रतिष्ठित व्यापाऱ्यांसह, भाजप नगरसेविकेच्या मुलाला अटक केली आहे. या सर्वांकडून तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.
परभणीत लॉकडाऊन दरम्यान गंगाखेड रस्त्यावरील एका बंद दाल मिलच्या आवारात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार काल रात्री उशिरा या हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. ज्यात जुगार खेळणारे परभणीतील 11 प्रतिष्ठित व्यापारी आणि भाजप नागरसेविकेचा मुलगा आढळून आला ज्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विषेश पथकाने ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, वाहन, जुगाराचे साहित्य असा एकूण 8 लाख 6 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शहरातील जुगल किशोर दरक, सुनिल मोदानी, लक्ष्मीकांत कुलथे, अमोल राठी, दत्ता मुखरे, राहुल भंडारी, जयप्रकाश लड्डा, राजगोपाल कासट, राजू गव्हाणे, सोपान देशमुख, चेतन मुदंडा आणि रितेश झांबड या 12 प्रतिष्ठित व्यापाऱ्यांवर शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यासह कलम 188, 269, 270 भादवीसह राष्ट्रीय आपत्ती अधिनियम सन 2005 चे कलम 51(ब) सह साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा कलम 2, 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. जी. पांचाळ यांच्यासह हनूमान कच्छवे, सखाराम टेकुळे, श्रीकांत घनसांवत, अतुल कांदे, पूजा भोरगे, वातोळे या कर्मचाऱ्यांनी केली आहे.