सोलापूर : जवळपास अडीच महिने तुरुंगात असलेल्या कैद्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सोलापुरतील कारागृहातील 45 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 22 मे रोजी आजारी असल्याने सोलापुरातील कारागृहातून एका कैद्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या कैद्याला न्यायालयाकडून 23 मे रोजी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र 24 मे रोजी रात्री या जामिनावर मुक्त करण्यात आलेल्या आरोपीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे.
11 मार्च रोजी जबरी चोरीच्या आरोपात या आरोपीला जिल्हा मध्यवर्ती कारगृहात रवाना करण्यात आले होते. जवळपास अडीच महिने हा आरोपी जेलमध्येच होता. मात्र 22 मे रोजी अचानक ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण कुठे झाली? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान या प्रकरणी सदर कैद्याला कोरोनाची लागण कुठून झाली याचा शोध सुरु असून त्याच्या संपर्कातील 45 जणांचे स्वॅब घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

कैद्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच कारागृह प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेतली आहे. कारागृहातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच कैद्यांचे स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कारागृह परिसरात निर्जंतुकीकरण देखील करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 141 कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत कारागृहात 317 कैदी कारागृहात आहेत. या आधी जिल्हा कारागृहात 401 कैदी होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार जवळपास 84 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासन वरिष्ठ प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि नियमांनुसार नियमितपणे कैद्यांची देखरेख करत होतं. कारागृहातील कैद्यांच्या आहारात बदल देखील करण्यात आला होता. कारागृहात येणाऱ्या प्रत्येकास हाताची स्वच्छता करण्यास सांगितले जात होते. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे ही प्रयत्न कारागृहात केले जात आहेत. याशिवाय नवीन येणाऱ्या कैद्यांसाठी नियमित बॅरेकमध्ये न ठेवता तात्पुरत्या जेलची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. इतकी खबरदारी घेतल्यानंतर देखील या बंदीस कोरोनाची लागण कुठे झाली याचा उलगडा होणे आवश्यक आहे.