Solapur News Update : उजनी धरणातील (Ujani Dam) विसर्ग वाढवून एक लाख क्यूसेक करण्यात आला आहे. वीर धरणाचा देखील विसर्ग 15 हजार एवढा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चंदभागा नदीकाठच्या नागरिकांची चिंता परत वाढली आहे. विसर्ग वाढवल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जायकवाडी (Jayakwadi Dam) धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून दीड लाख क्युसेकने पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
उजनी आणि वीर धरणातून काल सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आज पंढरपूरमध्ये पोचू लागल्याने हे पुराचे पाणी शिरू लागलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी मधील नागरिकांना सुरक्षित जागी हलविण्यास सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी चंद्रभागा तीरावर असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीतील अनेक घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. रात्री ही पाणी पातळी अजून वाढणार असल्याने प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली आहे. पाणी किती वाढणार याचा नेमका अंदाज येत नसला तरी या भागातील बहुतांश घरात आज रात्री पाणी शिरण्याची शक्यता आहे. या भागातील जवळपास शंभर कुटुंबे तसेच महाद्वार घाटावर राहणाऱ्या काही कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.
जायकवाडी धरणातून दीड लाख क्युसेकने पाणी सोडण्याची शक्यता
गेल्या चार-पाच दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी (Jayakwadi Dam) धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून दीड लाख क्युसेकने पाणी सोडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यासाठीची तयारी केली आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. दीड लाख क्युसेकने पाणी सोडल्यास नदी काठच्या अनेक गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वर्षात पहिल्यांदा दीड लाखा क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थीमुळे नदीकाठच्या गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नाशिक जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळं जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सध्या जायकवाडी धरणातून 99 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यावर्षी जुलै महिन्यातच जायकवाडी धरणातून पाणी सोडावे लागले होते. दरम्यान दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळं जायकवाडी धरणातील आवक सुद्धा वाढली आहे. त्यामुळेच जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यापूर्वी 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना आता, आपत्कालीन 9 दरवाजे सुद्धा उघडण्यात आले आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.