Shahajibapu Patil : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नागरिकांची आणि पिकांची तहान भागवण्यासाठी पुणे (Pune) जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात (Ujani dam) पाणी सोडण्याची मागणी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचे चटके बसू लागलेत. शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं शहाजीबापू पाटील यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. 


सांगोला आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांचं आंदोलन


नीरा उजवा कालव्यातून पाणी पाळी देण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर सांगोला आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनात आमदार शहाजीबापू पाटील हेदेखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन नीरा उजवा कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी पाळी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपोषण थांबवण्यात आले. 


पुणे जिल्ह्यातील पाच धरणातून प्रत्येकी दोन टीएमसी पाणी सोडा


सोलापूर जिल्ह्यात सध्या बिकट परिस्थिती आहे. पाऊस न झाल्यानं उजनी धरणात पाणी साठू शकले नाही. गेल्यावेळी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार बबनदादा शिंदे यांनी शेतीसाठी कालव्यातून एक आणि पिण्यासाठी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, सोलापूरचे आमदार विजय देशमुख यांनी पिण्याचा कोटा राखीव ठेऊन पाणी सोडण्याबाबत भूमिका घेतली होती. उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी एक पाण्याची पाळी आणि सोलापूरसह पंढरपूर, सांगोला आणि इतर नगरपालिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून पाणी द्यायचे झाल्यास यासाठी 14 टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या उजनी धरणातून एवढे पाणी सोडणे शक्य नसल्याने पुणे जिल्ह्यातील पाच धरणातून प्रत्येकी दोन टीएमसी आणि उजनीतून चार टीएमसी पाणी दिल्यास पिकांची आणि माणसांची तहान भागू शकेल असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 


15 दिवसात पाऊस न झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार 


पाणी प्रश्नाबाबत कालवा सल्लागार समितीची 2 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीत पाणी सोडण्याची मागणी करणार असल्याचे आमदार शहाजीबापू यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. येत्या 15 दिवसात पाऊस न झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याबाबत आम्ही शासनाकडे मागणी करणार असल्याची माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.         


दरम्यान, उजनी धरणाच्या वरील बाजूस पुणे जिल्ह्यात मुळा मुठा, उपखोऱ्यातील खडकवासला, टेमघर, पानशेत, मुळशी, पवना ही धरणे आहेत. तर घोड उपखोरऱ्यात पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, डिंभे, चीलेवाडी आणि घोड ही धरणे तर भीमा उपखोऱ्यातील कलमोडी, वडिवले, चासकमान , आंध्रा आणि भामा आसखेड अशी लहान मोठे 18 धरणे आहेत. ही धरणे भरल्याशिवाय हे पाणी उजनी धरणात येत नाही. दुर्दैवाने ज्यावेळी पूरस्थिती असते तेव्हा मात्र पुणे जिल्ह्यातील धरणातून पुराचे  पाणी उजनीत सोडून दिले जाते. यामुळं सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागाला पुराचा फटका सोसावा लागतो. मात्र, दुष्काळी परिस्थितीच्या वेळी उजनी धरणात पाणी सोडताना नेहमीच अडचणी आणल्या जातात. 


महत्त्वाच्या बातम्या:


Solapur News : उजनी धरणाने गाठला तळ, सोलापूरसह अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर?