अहमदनगर : अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्ये प्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांचा अटकपूर्व जमीन अर्ज अहमदनगरच्या जिल्हा स्तर न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील वकील महेश तवले यांनी हा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. दरम्यान बाळासाहेब बोठे यांच्या जमीन अर्जावर 11 डिसेंबर रोजी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. इतकेच नाही तर तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना आपले म्हणणे सादर करण्याची नोटीस देखील काढली आहे. त्यामुळे बाळासाहेब बोठे यांच्या अर्जावर न्यायालयात काय सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा घाटात गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केली असून त्यातील 3 आरोपींना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर 2 आरोपींना 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.


यातील आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे हे अद्यापही फरार असून त्यांचा तपास पोलीस करत आहेत. मात्र त्यांचा अटकपूर्व जमीन अर्ज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. या आर्जवर 11 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.


रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली.


संबंधित बातम्या