मुंबई : साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची नियमित सुनावणी 3 डिसेंबरपासून सुरू होत असल्यानं या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर सर्व आरोपींना कोर्टात हजेरी लावण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं जारी केले आहेत. अनलॉकनंतर राज्यभरातील सर्व कनिष्ठ कोर्टांचं नियमित कामकाज आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे या प्रलंबित खटल्यातील सुनावणींचा वेग वाढवण्याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टानं घेतला आहे.


वास्तविक गेल्यावर्षी एनआयएनं मुंबई उच्च न्यायालयात आश्वासन दिलं होतं की, डिसेंबर 2020 पर्यंत हा खटला निकाली काढला जाईल. मात्र लॉकडाऊनपूर्वीच्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ 14 जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात एकूण 475 साक्षीदार आहेत ज्यातील 300 हून अधिक साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे. मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे यात काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे महिन्याभरात ही सुनावणी कशी पूर्ण होणार हा सवालच आहे.


गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे निर्देश हायकोर्टानं याआधीच एनआयए कोर्टाला दिलेले आहेत. मात्र अनेकदा या खटल्याच्या सुनावणीला काही वकील हजरच राहत नाहीत. या खटल्याला जाणून बुजून विलंब केला जातोय, असा आरोप या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांच्यावतीनं वारंवार करण्यात आला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला एनआयए कोर्टाने लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी करत सध्या जामीनावर असलेले आरोपी समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात केला होती.


29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांना अटक करून त्यांच्यावर एनआयए विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील काही संशयित आरोप अद्याप फरार असून वरील सर्व आरोपी जामीनवर आहेत.