मुंबई : गावपातळीवर महसूल विभागाचं काम अधिक चोखपणे व्हावं, यासाठी राज्याच्या महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1984 सालानंतर पहिल्यांदाच तलाठी पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. राज्यभरात एकूण 3 हजार 84 नव्या तलाठ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.

महसूलमंत्र्यांच्या या निर्णयामुळे यापुढे 6 गावांना एक तलाठी मिळेल. त्यामुळे गावांमधील लोकांना कामासाठी सहजरित्या तलाठी उपलब्ध होण्यास मदत होईल. शिवाय, तलाठ्यांवरील कामाचा ताणही कमी होईल.

राज्यात सध्या एकूण 12 हजार 327 तलाठी सज्जे आहेत. त्यात वाढ केल्यानंतर 15 हजार 411 तलाठी सज्जे होतील. आगामी मंत्रिमंडळ समितीत याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

विभागीय संख्या किती असावी, याचा आराखडा उपसमितीने तयार केला आहे. जिल्हा स्तरावर किती सज्जे असावेत याची संख्या विभागीय आयुक्त ठरवतील. त्यानंतर तालुका स्तरावर किती सज्जे असावेत याची संख्या तहसिलदार ठरवतील.

1984 सालानंतर पहिल्यांदाच सालानंतर सज्जे संख्या वाढवली जात आहे. 2017 च्या सप्टेंबरमध्ये  3 हजार 84 तलाठी पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

 

विभागनुसार तलाठी भरती :

  • कोकणात सध्या 1 हजार 391 तलाठी असून, त्यात 744 ची वाढ करुन 2 हजार 135 करणार

  • नाशिक विभागात सध्या 2 हजार 63 तलाठी असून, त्यात 689 ची वाढ करुन 2 हजार 753 करणार

  • पुणे विभागात सध्या 2 हजार 496 तलाठी असून, त्यात 463 ची वाढ करुन 2 हजार 958 करणार

  • औरंगाबाद विभागात सध्या 2 हजार 474 तलाठी असून, त्यात 685 ची वाढ करुन 3 हजार 162 करणार

  • नागपूर विभागात सध्या 1 हजार 634 तलाठी असून, त्यात 478 ची वाढ करुन 2 हजार 112 करणार

  • अमरावती विभागात सध्या 2 हजार 267 तलाठी असून, त्यात 25 ची वाढ करुन 2 हजार 292 करणार