पुणे : बेपत्ता दोन्ही मुलींचे मृतदेहच सापडले
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2016 02:27 PM (IST)
पुणे : पुण्यातील हडपसरमधून बेपत्ता झालेल्या दुसऱ्या मुलीचाही मृतदेह कालव्यामध्ये सापडला आहे. त्याआधी काही वेळापूर्वीच एका मुलीचा मृतदेह याच कालव्यात सापडला होता. आठवीत शिकणाऱ्या या दोन अल्पवयीन मुली शाळेतून बेपत्ता झाल्याने हडपसर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही मुली मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. साडेसतरानळी इथल्या ज्ञानप्रबोधनी विद्यालयात पोहोचल्यानंतर दुपारी 12.30 च्या सुमारास डबा आणण्याचं कारण सांगून त्या शाळेबाहेर पडल्या. पण दप्तर शाळेत ठेवून त्या पुन्हा शाळेत आल्याच नाहीत. तर रात्री उशिरापर्यंत मुली घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध केली. शाळेत, नातेवाईकांकडे चौकशी केली, पण त्याचा पत्ता लागला नाही. अखेर हवालदिल झालेल्या पालकांनी रात्री उशिरा या मुलींचं अपहरण झाल्याची तक्रार हडपसर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांची पथकं मुलींचा शोध घेत होते. अखेर आज त्यापैकी एका मुलीचा मृतदेह हडपसरजवळील कालव्यात सापडला. त्यामुळे दुसऱ्या मुलीचाही शोध याच ठिकाणी सुरु होता. अखेर दोन्हीही मुलींचे मृतदेहच हाती लागले आहेत.