नाशिक : नाशिकच्या सिक्युरिटी प्रेस आणि मध्य प्रदेशच्या देवास प्रेसमध्ये मंगळवारी एका दिवसात रेकॉर्डब्रेक नोटांची छपाई झाली. या प्रेसमध्ये 3 कोटी 75 लाखांच्या नोटा छापण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 कोटी 65 लाख पाचशेच्या नोटा आहेत.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस या प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटा छपाईचं काम सुरु राहणार आहे.
देशातील नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटांची छपाई होते.
नाशिक आणि देवासमध्ये 2 हजारांच्या नोटांशिवाय सर्व छोट्या चलनाच्या नोटाही छापल्या जात आहेत. तर म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील प्रेसमध्ये केवळ 2 हजार आणि 500 च्या नोटा छापल्या जातात.
सालबोनी प्रेसच्या कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईमला विरोध
दरम्यान, पश्चिम बंगालमधील सालबोनी प्रिटिंग प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे. नोटाबंदीनंतर प्रिटिंग प्रेसचे कर्मचारी 12 तासांची शिफ्ट करत आहेत. दोन शिफ्टमध्ये छपाईचं काम सुरु आहे. ओव्हरटाईम करुन कर्मचारी आजारी पडत आहेत, असं कर्माचऱ्यांच्या असोसिएशनचा दावा आहे. दोन शिफ्टमध्ये आतापर्यंत 6 कोटी 80 लाख नोटा छापल्या जात होत्या. परंतु 9 तासांची शिफ्ट झाल्यानंतर केवळ 3 कोटी 40 लाख नोटाच छापल्या जातील, असं असोसिएशनचं म्हणणं आहे.