पुणे : महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. पुणे महापालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात भाजपचे सध्याचे नगरसेवक आणि कसबा-सोमवार पेठ प्रभागाचे उमेदवार गणेश बिडकर आणि मनसेतून काँग्रेसमध्ये गेलेले रवींद्र धंगेकर यांच्यात चांगलीच वादावादी झाली.


काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले असिफ बागवान आपला अर्ज मागे घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात आले असता बिडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बागवान यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी काही आमिषंही दाखवली, असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

उमेदवारी अर्ज मागे न घेण्यासाठी आपल्याला पैशांचं आमिष दाखवलं गेलं, पण पक्षाच्या आदेशानुसार धंगेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं असिफ बागवान यांनी स्पष्ट केलं.

बिडकर यांनी मात्र आपण आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी गेलो होतो, तेव्हा काँग्रेसचे पदाधिकारी बागवान यांना जबरदस्तीने अर्ज मागे घ्यायला लावत होते, असा पवित्रा बिडकर यांनी घेतला आहे.