रविना टंडन काय म्हणाली?
"अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.", असे अभिनेत्री रविना टंडन हिने ट्वीट केले आहे.
रविनाच्या ट्वीटला अनेक जणांनी प्रश्न केले, उत्तर दिले, काहींनी तिच्या विधानाचा प्रतिवादही केला. मात्र तरीही प्रत्येकाला उत्तर देताना रविना टंडनने आपली शेतकरी आंदोलनविरोधी भूमिका सोडली नाही.
श्रीनिधी मिश्रा नामक व्यक्तीने रविनाचा प्रतिवाद करताना म्हटले, "जर शेतकरी सुट्टीवर गेले, तर जग उपाशी राहील आणि मग तुम्हाला खायलाही मिळणार नाही, पर्यायाने तुम्ही असे हे मोफत इंटरनेट वापरण्यासाठी जगूही शकणार नाही." श्रीनिधी यांच्या ट्वीटला रिप्लाय देताना रविना म्हणाली, "मग तुम्ही काय करताय मोफत इंटरनेट वापरुन? तुम्हीही मोफत इंटरनेट वापरणं बंद करा आणि नासाडीला समर्थन करण्याऐवजी मदतीसाठी विचार करा."
शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, या साऱ्या गोष्टींवर चकारही न काढणाऱ्या रविना टंडनने नेमके आंदोलनातील नासधुसीवर बोट ठेवल्याने तिच्या मूळ ट्वीटवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलता दाखवत, त्यांना तुरुंगात डांबण्याची भाषा रविनाने केल्याने तिला टीकेला सामोरं जावं लागत आहे.