Sanjay Raut on Amol Kirtikar : शिवसेना नेते अमोल किर्तीकर ( Amol Kirtikar ) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची आज भेट घेतली. गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar)यांनी शिंदे गटात प्रवेश केला, पण अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची निवड केल्याने राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे. राऊतांनी यावेळी म्हटलं आहे की, 100 दिवस तुरुंगात राहून सुटका झाल्यावर जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षाही अधिक आनंद अमोल किर्तीकरांच्या शिवसेनेत राहण्याचा झाला आहे. अमोल आज भेटायला आले, त्यांनी वडील गजानन यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला, याचा आनंद तुरुंगातून सुटका होण्यापेक्षा अधिक आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.


'तुरुंगातून सुटल्यापेक्षा अमोल किर्तीकर सोबत राहिलाचा जास्त आनंद'


पुढे राऊतांनी म्हटलं आहे की, अमोल किर्तीकर हे आदित्य ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात सोबत असलेले कडवट शिवसैनिक आहेत आणि ते शिवसेनेबरोबरच आहेत. वडील गजानन किर्तीकरांच्या निर्णयामध्ये अमोल सहभागी नाहीत. अमोल किर्तीकर मूळ शिवसेनेसोबत आहेत. याचा आम्हांला सर्वांना आनंद आहे. अमोल किर्तीकर यांनी राऊतांची भेट घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रपणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 


गजानन किर्तीकर शिंदे गटात जाणं आमच्यासाठी दुदैवी - राऊत


गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी बाळासाहेबांची शिवसेना (SHinde Group) पक्षात प्रवेश घेत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. पण त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातच आहेत. याबाबत अमोल किर्तीकर ठाकरे गटात असण्यावर राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे. अमोल किर्तीकर यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'कालही मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेसाठी काम करत होतो, आजही करत आहे आणि भविष्यातही करत राहणार आहे.' गजानन किर्तीकर शिंदे गटात जाणं आमच्यासाठी दुदैवी असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे


'फडणवीसांनी विरोधी पक्षासोबत मिळून काम करावं'


उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षातील प्रमुखांशी संवाद साधून महाराष्ट्राबाहेर प्रकल्प का जात आहेत आणि हे कसं रोखता येईल यावर एक बैठक घेणं महत्त्वाचं आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीक करणं, थांबवून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायला हवं, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.


'राजकारण नंतर करु, महाराष्ट्र खचता कामा नये'


एकामागोमाग एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावर संजय राऊत यांनी चिंता व्यक्त करत म्हटलं आहे की, प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याचं खापर एकमेकांवर फोडण्यापेक्षा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का जात आहेत, यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र मिळून विचार करत निर्णय घेणं आवश्यक आहे. राजकारण करण्यासाठी आणि राजकीय शत्रूत्व जपण्यासाठी उभा जन्म पडलाय, पण महाराष्ट्र खचला किंवा कमी झाला तर आपण राजकारण करायला उरणार नाही, याचं भान सत्ताधारी आणि विरोधकांनी ठेवायला हवं, असंही राऊत म्हणाले आहेत.