रत्नागिरी : उदय सामंत (Uday Samant) राज्याचे उद्योगमंत्री ! रत्नागिरी - संगमेश्वर हा त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ. अमदार म्हणून उदय सामंत यांची ही चौथी वेळ. उदय सामंत मंत्री म्हणून पुढं दिसत असले तरी त्यांच्या पाठीमागे त्यांचे वडिल रविंद्र उर्फ आण्णा सामंत आणि भाऊ किरण ऊर्फ भैय्या सामंत त्यांच्या मतदारसंघावर लक्ष ठेवून असतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात वावरताना त्यांची प्रचिती येते. पण, आता उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भैय्या सामंत राजकारणात सक्रिय होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत
या चर्चांचे कारण म्हणजे किरण सामंत यांची सिंधुरत्न समुद्धी योजनेच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. मंत्री दिपक केसरकर यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया तर उंचावल्या तसेच विविध चर्चांना देखील सुरूवात झाली. किरण सामंत हे व्यवसायिक आहेत. आतापर्यंत त्यांनी राजकीय पक्षांचं कोणतंही पद घेतलं नाही. पण, सत्तांतर झालं आणि शिंदे - फडणवीस सरकार येताच किरण सामंत यांच्या खांद्यावर कोकणातील सिंधुरत्न योजनेच्या सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली.
किरण सामंत आतापर्यंत राजकारणात फ्रंटफुटला दिसले नाहीत. पण, पडद्यामागून सूत्र हालवण्यात त्यांचा हातखंडा असल्याचं अनेक जण सांगतात. त्यामुळे त्यांना किंगमेकर देखील म्हटलं जातं. मंत्री उदय सामंत यांच्या पाठीमागे किरण सामंत कसे खंबीरपणे उभे आहेत? याच्या विविध चर्चा देखील ऐकायला मिळतात. उदय सामंत यांच्या मतदारसंघात किरण सामंत यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात असतो. कार्यकर्त्यांची गाठीभेटी, अडलेली कामं करण्यासाठी किरण सामंत यांच्याकडे देखील मोठ्या संख्येनं लोकं येत असतात. उदय सामंत हे आमदार, मंत्री असले तरी कार्यकर्ते, मतदार यांना बांधून ठेवण्यामागे त्यांचे वडिल अण्णा सामंत, भाऊ किरण सामंत यांचं योगदान देखील मोठं असल्याचं मानलं जातं. त्यामुळे किरण ऊर्फ भैय्या सामंत यांना 'किंगमेकर' म्हणून देखील संबोधले जाते.
काय आहे किरण सामंत यांची कारकिर्द?
किरण सामंत हे पेशानं इंजिनिअर आहेत. बांधकाम हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. सध्या किरण सामंत वडिलांचा बांधकामाचा व्यवसाय सांभाळत आहेत. शिवाय, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांचा संवाद देखील चांगला आहे.
कोकणातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल?
सध्या किरण सामंत यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची केवळ चर्चा आहे. किरण सामंत हे आमदारकी लढवणार किंवा खासदारकी लढवणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण, किरण सामंत यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशानं मात्र कोकणातील गणितं काही प्रमाणात बदलू शकतात असा मानणारा देखील एक वर्ग आहे. शिवाय, किरण सामंत यांचे सर्वपक्षीयांशी संबंध हे चांगले आहे. त्यामुळे आता सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कोकणात आगामी काळात राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.