रत्नागिरी: रत्नागिरीतील चिपळूनमध्ये शिवनदीची जलवहन क्षमात पाच पटीने वाढणार आहे. नाम फाऊंडेशनने सुरु केलेला गाळ उपसा कार्यक्रम पुर्णत्वास गेला आहे. तर प्रशासनामार्फत काढण्यात आलेला हजारो टन गाळ अजूनही नदीपात्रातच असल्याचं समोर आलं आहे. 


गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने 22 जुलैला कोकणात हाहाकार माजवला. यात चिपळूण आणि महाडची पुरामुळे अक्षरशः दयनीय अवस्था झाली. घरे आणि व्यापारी वर्ग यांची मोठी वित्त हानी झाली होती. कामथे ते चिपळूण शहरापर्यंत वाहणारी शिवनदी वाशिष्ठीला जाऊन मिळते. कित्येक वर्षे शहरातील या नद्यांचे गाळ काढण्यात आलेला नाही असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
 
नाम फाऊंडेशनच्या वतीने गेल्या पाच महिन्यात हे काम दिवसरात्र नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वास गेले आहे. हे काम करताना या नदीची खोली आणि रुंदी वाढवण्यात आलेली आहे. आतपर्यंत सुमारे 2,44,244  घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत ही शिवनदी पाच पटीच्या क्षमतेने जलवहन करणार आहे असा दावा नाम संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. या काढलेल्या गाळामुळे शिवनदी नक्कीच मोकळा श्वास घेऊन वाहणार आहे. 
 
त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात नदीचे पाणी पात्राबाहेर येणार नाही असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. या अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरच नव्हे तर इतर गावांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गावागावांतील वाहणाऱ्या नद्या पूर्ण गाळाने भरल्या. तिथल्याही गावकऱ्यांच्या मागणीनुसार नाम फाउंडेशनने ते काम हाती घेऊन तेथील नद्यांचा गाळ उपसा करून दिला. 


आता जरी पाऊस पडला तरी पाणी नदीपात्राबाहेर येणार नाही. अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नाम फाउंडेशनने हाती घेतलेला गाळ उपसा आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या पावसाळ्यात चिपळूणवासिय शिवनदीपासून थोड्या प्रमाणात तरी मोकळा श्वास घेतील. 


मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणसहित पश्चिम महाराष्ट्रातही महापूर आला होता.