रत्नागिरी : लॉकडानमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम दिसत आहे. अनेकांचे रोजगार गेले, कुणाला काम मिळेनासे झाले. पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला. तर अनेकांचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. चित्रपट इंडस्ट्री आणि त्याच्याशी संबंधित अनेकांनाही याचा मोठा फटका बसला. डान्सर, मेकअप आर्टिस्ट, छोटे- मठे कलाकार सर्वांनीच परिस्थितीसमोर हात टेकले. पण रत्नागिरीतील एका डान्सरने मात्र संकटाच देखील संधी शोधली. 2011मध्ये मराठी पाऊल पडते पुढे, महाराष्ट्राचा डान्सिंग स्टार या रिअॅलिटी शोमध्ये झळकलेला मराठमोळा तरुण सध्या ऑनलाईन मासे आणि भाजी विकत आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्याची लॉकडाऊनच्या काळातही धडपड सुरु आहे. घराचा इएमआय, गाडीचा हफ्ता आणि संसाराचा खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न त्याला पडला आणि त्यातूनच त्याने हा निर्णय घेतला. किरण बोरसुतकर असं या तरुणाचे नाव असून तो सध्या रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात ऑनलाईन ऑर्डर घेत भाजी आणि मासे विक्री करत आहे. त्याच्या या प्रयत्नांना नागरिकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
का घ्यावा लागला निर्णय?
गेली 17 वर्षे किरण रत्नागिरीमध्ये डान्स अकॅडमी चालवत आहे. तर 30 वर्षापासून तो डान्सिंगच्या क्षेत्रात आहे. पण लॉकडाऊनमुळे त्याचे क्लासेस बंद पडले. त्यानंतर हफ्त्यांवर सुरु असलेलं आयुष्य सावरायचे कसे? असा प्रश्व त्याला पडला. त्याचवेळी त्याच्या डोक्यात ऑनलाईन मासे आणि भाजी विक्रीची कल्पना आली. त्याने ती आपल्या पत्नीला बोलून दाखवली. त्याच्या पत्नीनेही या गोष्टीला संमती दिली. त्यानंतर सोशल मीडियाचा आधार घेत जाहिरातीला सुरुवात केली. सुरुवातील थोडे कठीण गेले पण, त्यानंतर मात्र प्रतिसाद वाढत गेला. लॉकडाऊनच्या काळात घरपोच मासे मिळत असल्याने खवय्यांकडूनही मागणी वाढत गेली. लॉकडाऊनच्या काळात पैसे येणे बंद झाल्यामुळे मोठं संकट उभं राहिलं होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी धडपड करणे गरजेचे होते. मासे आणि भाजी विक्रीची कल्पना डोक्यात आल्यानंतर काहीशी धाकधूक होती. पण आता मात्र प्रतिसाद चांगला मिळत आहे. पैशाचे सारे मार्ग संपलेले असताना आता मात्र काही प्रमाणात धीर येऊ लागल्याची भावनी किरणने 'एबीपी माझा'कडे बोलून दाखवली. तर, आम्ही प्रत्येक गोष्ट शून्यातून सुरु केली. त्यात आम्हाला हळहळू यश येत गेले. किरणने घेतलेल्या या निर्णयाचा मला अभिमान आहे. कालांतराने हे दिवस देखील जातील अशी भावना त्याची पत्नी स्नेहल व्यक्त करते.
'हार न मानता पुढे गेले पाहिजे'
ऑनलाईन मासे आणि भाजी विक्रीची आयडिया चांगली आहे. लॉकडाऊनमुळे मासे मिळणे दुरापस्त असताना घरी ताजे, फडफडीत मासे मिळत असतील तर ते कुणाला नको आहेत? आम्हाला घरी मासे मिळत असल्याने प्रकृतीची देखील काळजी घेतली जाते. शिवाय, मासे खाण्याची इच्छा देखील पूर्ण होते. आतापर्यंत आम्ही किरणकडून घेतलेल्या मच्छीमध्ये तक्रारीची संधीच मिळाली नसल्याचे ग्राहक सुहास भोळे यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात हार न मानता पुढे गेले पाहिजे आणि किरण तेच करतो अशी प्रतिक्रिया देखील भोळे यांनी व्यक्त केली. मागील 15 दिवसांपासून ते किरणकडून मासे विकत घेत आहेत.