रत्नागिरी: कराडमधून माजी डीवायएसपीचं अपहरण करुन तब्बल साडे चार कोटी रुपये पळवणाऱ्या टोळीला मोठ्या थराराअंती कैद करण्यात आलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत रत्नागिरी पोलिसांनी पाठलाग करुन, या टोळीला जेरबंद केलं आणि रोकडही जप्त केली.

मंगळवारी दुपारी कर्नाटकच्या ज्ञानयोगी श्री शिवकुमार स्वामीजी शुगर साखर कारखान्याचे कर्मचारी ऊस हंगामाच्या करारासाठी कराडमध्ये आले होते. त्यांनी व्यवहारासाठी तब्बल साडे चार कोटी रुपये सोबत आणले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, एका हॉटेलातून माजी डीवायएसपी बसवराज चोकीमट यांचं अपहरण करुन पैसेही चोरट्यांनी नेले होते.  यानुसार रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर राजापूर- देवरुख या ठिकाणी नाकेबंदी केली.  आणि एका स्कॉर्पिओचा पाठलाग करुन 3 आरोपी आणि साडे चार कोटी रुपये हस्तगत केले.

रत्नागिरीतील संगमेश्वर पोलिसांनी तीन आरोपींसह साडेचार कोटीची रोकड मध्यरात्री कराड पोलिसांच्या ताब्यात दिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काल दुपारी कर्नाटकच्या ज्ञानयोगी श्री शिवकुमार स्वामीजी शुगर साखर कारखान्याचे काही लोक कराडमध्ये ऊस हंगामातील एका करारासाठी आले होते. त्यांच्यासोबत बसवराज चोकीमट हे निवृत्त पोलिस उपअधीक्षकही होते.यावेळी त्यांनी व्यवहारासाठी आपल्यासोबत साडेचार कोटी रुपये आणले होते. ही रक्कम घेऊन त्यांचा पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु होता.

यावेळी कराड शहराजवळ साखर कारखान्याच्या लोकांची गाडी अडवून, अपहरणकर्त्यांनी बसवराज चोकीमट यांच्यासह साडेचार कोटी रुपयाची रोकड घेऊन पोबारा केला. आरोपींनी इनोव्हा गाडीने डीवायएसपींची गाडी अडवली. त्यानंतर गाडीतील इतरांना उतरवून, निवृत्त डीवायएसपी आणि रोकड घेऊन आरोपी पसार झाले.

या थरारानंतर पोलिसांनी सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तातडीने सूत्रं हलवत नाकेबंदी केली.

काही वेळाने अपहरणकर्त्यांनी निवृत्त डीवायएसपींना चिपळूणमध्ये सोडलं. त्यांचं अपहरण करुन, लुटमार केली आणि त्यांना रत्नागिरीत घेऊन गेले.

“मला अपहरण करुन घाट मार्गाने चिपळुणात आणण्यात आले. इथे आपल्याला टाकून दिल्यावर अपहरणकर्त्यांच्या गाड्या रत्नागिरीच्या दिशेने रवाना  झाल्या” असं या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पळून जाणाऱ्या गाड्यांचा पाठलाग

यानंतर रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर- राजापूर- देवरुख या ठिकाणी नाकेबंदी केली.  संगमेश्वर येथे नाकाबंदीत दोन गाड्यांनी संशयितरित्या पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने, संगमेश्वर पोलिसांनी मुंबई- गोवा महामार्गावर या गाड्यांचा पाठलाग सुरु केला.

काही किलोमीटरच्या पाठलागानंतर संगमेश्वर पोलिसांना एक स्कॉर्पिओ रस्त्यात सोडून दिलेल्या अवस्थेत आढळून आली. यानंतर संगमेश्वर पोलिसांनी अस्केंट गाडीचा पाठलाग करत ती ताब्यात घेतली.

यातील तीन आरोपींना जेरबंद करण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले. या गाडीतून पोलिसांनी चार कोटी 48 लाख रुपयांची रोकडही जप्त केली. मध्यरात्रीपर्यंत हा सर्व थरार सुरु होता.

मध्यरात्रीनंतर संगमेश्वर पोलिसांनी आरोपी आणि चार कोटी 48 लाख रुपयांची रोकड पोलसांच्या ताब्यात दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कराड पोलीस करत आहेत.