रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा 24 एप्रिल रोजी अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या त्या वक्तव्यावरुन शिवसेनेच्याच नेत्याने शिवसेनेचा उमेदवार चिपळूण-संगमेश्वर या मतदरासंघातून पाडला का? त्याचा पराभव केला का? अशी चर्चा रंगली होती. पण, त्यावर आता उदय सामंत यांनी आपलं मौन सोडलं आहे. "शंका उपस्थित करणारे किती प्रामाणिक आहेत? हे तपासून पाहावे. आगामी विधानसभा निवडणुकीत सदानंद चव्हाण हे शिवसेनेचे उमेवार असतील. यावेळी 50 हजारांचा फुगा कसा फुटला हे केवळ मला आणि शेखर निकम यांना माहित आहे, असं मी मी म्हटलं. पण, काही विद्वानांनी विपर्यास केला. चव्हाणांच्या विरोधात कुणी प्रचार केला हे माहित होते. हे मी जाहीरपणे बोललो. सदानंद चव्हाण आणि माझे घरचे संबंध आहेत. पण जे कुणी शंका उपस्थित करत आहेत ते किती प्रामाणिक आहेत हे देखील पाहिले पाहिजे," असं सामंत यांनी म्हटलं. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दौऱ्यावेळी चिपळूण इथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावल्याचं स्पष्ट केलं. ज्यावेळी उदय सामंत यांनी 50 हजारांचा फुगा कसा फुटला याबाबत वक्तव्य केलं. त्यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हजर होते. 



काय म्हणाले होते सामंत?
24 एप्रिल रोजी अजित पवार चिपळूण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोविंद निकम यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर सर्वच नेत्यांची भाषण देखील झाली. नेत्यांनी मारलेल्या कोपरखळ्यांनी देखील यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या भाषणादरम्यान बोलताना उदय सामंत यांनी "लोकसभेला आम्हाला 52 हजारांचं मताधिक्य होतं. आमचा फुगा मोठा होता. पण, त्यानंतर देखील चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून शेखर निकम विजयी झाले. आमचे 50 हजारांचे लीड त्यांनी तोडले. त्याचा पॅटर्न केवळ त्यांना आणि मला माहित आहे. हा पॅटर्न महत्त्वाचा आहे. माझे आणि शेखर सरांचे काही कॉमन मित्र आहेत ते त्यांच्या मतदारसंघात त्यांना आणि माझ्या मतदारसंघात मला मदत करतात," असं जाहीर वक्तव्य सामंत यांनी केलं आणि सर्वांच्या भुवया मात्र उंचावल्या. कारण याच मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सदानंद कदम यांना दोन हजारांच्या मताधिक्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे साहजिकच उदय सामंत यांच्या या वक्तव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. शिवाय, त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता.