रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन प्रहार करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे. "नॉन मॅट्रिक असलेल्या माणसाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असंस्कृत म्हणणे यासारखा दुसरा विनाद नाही," अशा शब्दात  विनायक राऊत यांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली आहे.


"उद्धव ठाकरे हे असंस्कृत सीएम आहेत. ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते. मुख्यमंत्र्यांनी जाहिरातबाजी करुन सभा घेतली. 300 रुपये देऊन बीकेसीतील सभेला लोक जमा केले. घड्याळ लावून मी ठाकरेंची सभा पाहिली, फक्त 50 मिनिटं ही सभा चालली. उद्धव ठाकरेचं भाषण बोगस होतं," अशा खोचक शब्दात नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतील पत्रकार परिषदेत टीका केली होती. 


या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रात्नागिरीतील पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. ते म्हणाले की, "नॉन मॅट्रिक असलेल्या माणसाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अस्कृंत म्हणणे यासारखा दुसरा विनाद नाही."


'राज ठाकरेंच्या पुण्याच्या सभेकडे गांभीर्याने बघण्याची गरज नाही'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेवरुन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. अशा भुईनळ्या खूप उडालेल्या आहेत. शिवसेनेच्या वाघाची डरकाळी काय होती हे सर्वांनी 14 मे रोजी पाहिलं आहे. त्यामुळे पुण्याच्या सभेकडे आम्हाला गांभीर्याने बघायची गरज नसल्याचा पुनरुच्चार शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला.


पोस्टर्स लावून मनसेची ड्रामेबाजी
मुंबईत मनसेने लावलेली पोस्टर्स ही फक्त आणि फक्त ड्रामेबाजी आहेत. त्यात तथ्य काही नाही, धमकी संदर्भात पोलीस त्यांचा बंदोबस्त करतील. महाराष्ट्राच्या बाहेरुन जर कुणी उपदव्याप केले असतील तर केंद्र सरकारने या संदर्भातील दखल घेऊन बंदोबस्त करावा, असं सांगत मनसेच्या मुंबईतल्या पोस्टर्सचा समाचार शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी घेतला.


...म्हणून दुर्गम भागातील निधीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी परस्पर दिलेल्या कामांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे आमदार आहेत त्यांना विश्वासात घेऊन कामं दिली जावीत, अशा पद्धतीचे सुतोवाच निघाले आहेत. प्रत्यक्ष ज्या आमदारांनी पुरावे दिले खासकरुन स्थानिक आमदारांनी तक्रारी दिल्याने दुर्गम भागातील कामांना स्थगिती दिली आहे. प्रत्येक मंत्र्यांना निधी देण्याचा अधिकार असतो. पण त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार निधी दिला जावा अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार दुर्गम भागातील निधी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं आहे, असं सांगत विनायक राऊत यांनी या प्रश्नावर सावध प्रतिक्रिया नोंदवली.


ज्ञानवापी मशिदी गंभीरपणे विचार करुन केंद्र सरकारने पाऊल उचलावं  
ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. मशिदीच्या आत शिवलिंग असल्याचं संशोधन सुरु आहे त्या ठिकाणी हिंदू मंदिराचे अवशेष आहेत ते जर असेल तर त्याची योग्य ती दखल केंद्र सरकारने आणि तिथल्या राज्य सरकारने घेणे गरजेचे आहे. ज्या भागात हिंदू मंदिराचे अवशेष सापडले असतील तो भाग संरक्षित करावा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अत्यंत गंभीरपणे विचार करुन पुढचं पाऊल उचलणं गरजेचं आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं.


'ओबीसी आरक्षणाची हत्या कुणी केली हे देवेंद्र फडणवीस यांनी तपासावं'
ओबीचा आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यावरुन सध्या राजकीय गरमागर्मी सुरु आहे. ओबीसी आरक्षणाची हत्या कुणी केली हे देवेंद्र फडणवीस यांनी तपासून पाहावं, असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन दिवस आधी आरक्षण नाकारलं जातं आणि दोन दिवसानंतर पुन्हा आरक्षण मिळतं हे न उलगडणारं कोडं आहे. महाराष्ट्राने नेमकं काय पाप केलं आहे. महाराष्ट्र सरकार ओबीसींना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. याचा सर्वोच्च न्यायालयाने त्याचा विचार करण गरजेचं होतं. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोघांना प्रथम समान न्याय दिला. मात्र नंतर मध्य प्रदेशात चक्र कसं फिरलं, याकडे देश देखील आश्चर्याने पाहत आहे, असं राऊत यांनी म्हटलं.