Ajit Pawar : 12 आमदारांच्या निमित्ताने मी विचार करतो आहे असं राज्यपाल सांगतात. मात्र, ज्यावेळी आम्ही त्यांना भेटतो त्यावेळी ते केवळ 'करेंगे अजितजी करेंगे' असं म्हणतात असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच यावेळी अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातही वक्तव्य केलं. आम्ही ओबीसी समाजाचे अधिकार मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो असेही पवार यावेळी म्हणाले.


त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती नाही
 
राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीच्या बातम्या सर्वांनी पाहिल्या आहेत. आता त्या दोघांची याबाबात काय चर्चा झाली याची अद्याप तरी माहिती समोर आलेली नसल्याचे अजित पवार म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्रात निर्णय लागू होऊ शकतो का? यासाठी आम्ही माहिती घेत आहोत. विधी व न्याय खात्यासोबत देखील आम्ही चर्चा करत असल्याचे अजित पवार म्हणाले. जर आपल्याकडे देखील मध्य प्रदेश सरकारसारखा निकाल लागला असता तर सर्वचजण म्हणाले असते आमच्यामुळे झाले. आता आपल्या राज्याबाबत जो निर्णय दिला तो त्यांचा अधिकार असणार आहे. राज्यात 50 टक्क्यांची अट न ओलांडता आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.


कैद्यांसाठी भजन स्पर्धा


शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा २०२२ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर अजित पवार बोलत होते. राज्यातील 27 कारागृहातील बंदिवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जे बंदिवान आहेत त्यांच्यापुढे चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या स्पर्धेत बक्षीस देखील मोठे ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक सहभागी संघास भजनाचे संपूर्ण साहित्य देण्यात येणार आहे. यासाठी 40 दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.