रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं, वागणं हे लबाडा घरचं आवताण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. रत्नागिरीत काल (24 फेब्रुवारी) महाराष्ट्र एसटी संघटनेच्या 55व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात शरद पवार बोलत होते.


शरद पवार म्हणाले की, "एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊ, धनगर समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, अशी अनेक आश्वासनं दिली मात्र त्यापैकी एकही पूर्ण केलेली नाहीत." त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं, वागणं हे लबाडाच्या घरचं आवताण असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवताना त्यांनी लबाडाच्या घरचं आवताण कसं असतं याचं उदाहरणही दिलं, त्यामुळे एकच हशा पिकला होता. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, "पाच वर्षांपूर्वी बारामतीला आले. आमचं सरकार आल्यावर आठ दिवसांच्या आत आरक्षण देऊ, पाच वर्ष झाली तरी आश्वासन पूर्ण झाली, आरक्षणाचा पत्ता नाही. तीन वर्षांपूर्वी तुमच्या अधिवेशनात आले. सातव्या आयोगाची घोषणा केली, अनेक आश्वासनं दिली, पण त्यापैकी कोणतंही पूर्ण केलं नाही."