रत्नागिरी : जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे. 2 जूनच्या मध्यरात्रीपासून अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, यापूर्वी 2 जून ते 8 जून अशी लॉकडाऊनची तारीख होती. पण, लोकांना वेळ मिळावा, कुठंही गोंधळ होऊ नये या दृष्टीनं 3 ते 9 जूनच्या कालावधीत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यावेळी जिल्हावासियांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या कालावधीमध्ये सर्व प्रकारची दुकानं आणि आस्थापनं बंद राहणार असून केवळ 11 वाजेपर्यंत दुधाच्या होम डिलिव्हरीचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून जिल्हा प्रवेशासाठी ई पास अनिवार्य करण्यात आलेला आहे. शिवाय, एसटी, सरकारी आणि खासगी वाहतूक देखील या कालावधीमध्ये बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी एसटी सेवा सुरू राहिल. तर, शेतकऱ्यांकरता आणि शेती संबंधित कामकाजाकरता बँका आणि वित्तीयसंस्था यांचं कामकाज 2 वाजेपर्यंत सुरू राहणार असून यावेळी केवळ 10 टक्के कर्मतारी हजर राहतील. तर पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार असून हायवेवरील पंप मात्र 24 तास मालवाहतुकीसाठी सुरू राहतील.
लग्न, समारंभांवर आता करडी नजर
दरम्यान, आता जिल्ह्यातील लग्न समारंभांवेळी नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आल्यानंतर त्यावर आता लक्ष ठेवले जाणार आहे. लग्नाच्या ठिकाणी एक कॉन्स्टेबल, व्हिडीओग्राफर आणि तलाठी हजर राहून यावर नजर ठेवतील. यावेळी केवळ 25 जणांच्या उपस्थितीला मान्यता असून सर्वांना अँन्टिजेन चाचणी बंधनकारक असणार आहेत.
..तर मेडिकल दुकानांना 10 हजारांचा दंड
काही मेडिकल दुकानांमध्ये औषधांशिवाय इतर सामान देखील विकल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा प्रकारे कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांना 10 हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे.
3 जून ते 9 जून दरम्यान खालील महत्त्वाचे नियम असणार लागू
- सर्व प्रकारची दुकानं बंद, केवळ दुधाची 11 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी होणार
- जिल्ह्याच्या सीमा बंद; प्रवेशासाठी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य
- जिल्ह्यात प्रवेशासाठी आता ई पास अनिवार्य
- सर्व प्रकारची खासगी, सरकारी वाहतूक बंद
- अत्यावश्यक सेवेसाठी केवळ एसटी सुरू राहणार
- बँक आणि वित्तीय संस्था कामकाज शेतकऱ्यांचा विचार करता सुरू राहणार; केवळ 10 टक्के उपस्थिती राहणार
- बँक, वित्तीय संस्था 2 वाजेपर्यंत सुरू राहणार; वित्तीय संस्थांमध्ये केवळ शेतकऱ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार सुरू राहणार
- एमआयडीसीमधील अत्यावश्यक सेवेत नसेलेले उद्योग बंद राहणार
- सर्व खासगी कार्यालयं बंद, शासकीय कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती; केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कार्यालयं 15 टक्के उपस्थितीसह राहणार सुरू
- जिल्ह्यातील पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार; मालवाहतुकीसाठी हायवेवरील पेट्रोल पंप मात्र 24 तास सुरू राहणार
- बियाणं, खते, किटकनाशके यांची दुकानं ठराविक वेळेमध्ये सुरू राहणार
- हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार बंद; होम डिलिव्हरी देखील बंद
- हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरीबाबत काही दिवसानंतर निर्णय
- चिकन, मटन, मच्छिची, दुकानं बंद
- मेडिकल दुकानांमध्ये इतर सामानाची विक्री झाल्यास 10 हजारांचा दंड
- लग्नाच्या ठिकाणी कॉन्स्टेबल, तलाठी आणि व्हिडीओग्राफर असणार; केवळ 25 जणांची उपस्थिती तर अँन्टिजेन टेस्ट अनिवार्य
- रेल्वेनं येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्टेशन्सवर कोरोना चाचणी होणार
- शासकीय बांधकामं वगळता इतर सर्व प्रकारचे कामकाज बंद राहणार
- लसीकरण सुरू राहणार; त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही