रत्नागिरी : कपडे आणि राहणीमानावरुन उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील वाटणाऱ्या महिलांनी मोठ्या शिताफीने सराफाच्या दुकानातून दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरीतील सराफा व्यावसायिकाच्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला.


 
मुंबई, कोल्हापुर, सांगली, औरंगाबाद रत्नागिरीसह अनेक शहारांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून या महिलांच्या गँगनं घुमाकूळ घातला. मात्र रत्नागिरीमध्ये पुन्हा चोरी करण्यासाठी येणं या गँगला महागात पडलं आणि ही टोळी जेरबंद झाली.

 
सोन्यावर डल्ला मारणाऱ्या या गँगमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. शिवाय दोन चिमुकल्यांचाही वापर ही गँग करत होती.

 

विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी ही गँग सराफांच्या दुकानासमोर अलिशान स्कार्पिओ गाडीतून येत होती. पोलिसांनी या गँगकडून एक स्कार्पिओ गाडील अडीच लाख रुपयांचं सोनं, 51 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे.

 
रत्नागिरीमधील सराफांची सतर्कता आणि पोलिसांनी तातडीनं केलेली कारवाई यामुळे सराफांना लुटणारी गँग जेरबंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रात कुठे-कुठे या गँगनं धुमाकूळ घातला याचाही शोध लागेल.