रत्नागिरी : गुहागर तालुक्यात असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्ट या कंपनीमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार टिकून राहावा यासाठी प्रयत्न करणारे आमदार भास्कर जाधव हे अडचणीत आलेला हा प्रकल्प चालू राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी याप्रश्नी लवकरच दिल्लीमध्ये पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट हा 1967 मेगावॅट क्षमता असलेला गॅसवर आधारित भारतातील सर्वात मोठा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.परंतु, गॅसची वाढलेली किंमत आणि पर्यायाने निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्त असल्याने वीज खरेदी करण्यासाठी कोणी पुढे येत नाही.त्यामुळे हा प्रकल्प सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे.
रत्नागिरी गॅस अँड पावर प्रोजेक्टचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसोबत सन 2032 पर्यंत वीज खरेदीचा करार असताना महावितरणने सन 2014 पासून वीज खरेदी थांबवली आहे तर दुसरीकडे भारतीय रेल्वेला सुरू असलेला 540 मेगावॅट वीज पुरवठाही थांबला आहे. परिणामी हा प्रकल्प सद्यस्थितीत खूपच अडचणीत आला आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
कंपनीतील कर्मचार्यांचा रोजगार टिकून राहावी यासाठी आमदार जाधव सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु त्याचबरोबर प्रकल्पही सुरू राहिला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते मुंबईत अनेकांना भेटले. त्यात आज खासदार शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंथा, कंपनीचे सल्लागार हिरानंद हरचंदानी, सहाय्यक व्यवस्थापक सबरी गिरीश एन हेदेखील उपस्थित होते.
कंपनीकडे वेगवेगळ्या राज्यातून विजेची मागणी आहे परंतु वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला गॅस कमी किंमतीत उपलब्ध होत नाही.कंपनीचे अधिकारी त्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करीत आहेत.मात्र त्यात त्यांना यश येत नाही, ही बाब आमदार भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्याकडे मांडली आणि यावर मार्ग काढण्याची विनंती केली.शरद पवार यांनी हा संपूर्ण विषय अत्यंत गांभीर्याने समजून घेतला आणि आमदार भास्कर जाधव, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना लवकरच दिल्लीमध्ये बोलावून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.