मुंबई : निवडणुकीच्या काळात पदमुक्त करण्यात आलेल्या माजी पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मंगळवारी किंवा बुधवारी यासंदर्भात निर्णय होऊ शकतो अशी माहिती आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच रश्मी शुक्लांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती.
राज्यातल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवण्यात आलं होतं. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली होती. पण त्यांच्या नियुक्तीमध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आला होता.
विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजून आला असून राज्यात आता महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर लगेचच रविवारी संध्याकाळी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती होणार अशी माहिती आहे. येत्या एक दोन दिवसात हा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Who Is Rashmi Shukla : कोण आहेत रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. रश्मी शुक्ला यांनी भूगर्भशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. वयाच्या 22 व्या वर्षी त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 2005 रश्मी शुक्ला यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 2008 मध्ये त्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सन 2013 मध्ये, रश्मी शुक्ला यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले. 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.
सन 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह अनेक जणांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. राज्याच्या पोलीस महासंचलाकपदी नियुक्ती होण्यापूर्वी रश्मी शुक्ला या केंद्रात सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. जून 2024 मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. मात्र, राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.
ही बातमी वाचा: