Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य पोलीस महासंचालकपदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. रश्मी शुक्ला यांना 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, त्यानंतर राज्य सरकार त्यांना मुदतवाढ देऊ शकते.
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्यांपैकी एक, आहेत. सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले.
फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत
रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप (Rashmi Shukla Phone Tapping Case) केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती.
फोन टॅपिंग प्रकरणी पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल
काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी आयपीएस पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला आहे. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाची सूत्रे येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.