जळगावः जळगावमध्ये महिला आयोगाच्या सदस्यावर असंवेदनशीलपणाचा गंभीर आरोप होत आहे. शहरातील मेहरुण परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मात्र महिला आयोगाच्या सदस्यांनी सांत्वन करण्याऐवजी मुलीच्या कुटुंबीयांचीच उलट तपासणी केली, असा आरोप आहे.

 

 

महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी पीडित मुलीच्या घरी भेट दिली. मात्र या भेटीत ठाकरे यांनी सर्वांसमोर पीडित मुलीची उलट तपासणी केल्याचा आरोप लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी केला आहे.

 

 

देवयानी ठाकरे यांच्या विरोधात सध्या तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र देवयानी ठाकरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून महिला आयोग मुलीच्या पाठिशी असल्याचं सांगितलं आहे.

 

 

राजू निकम या चाळीस वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. मात्र अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नाही. महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, मात्र त्यांच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप होत आहे.