मुंबई: 'आमचा खरा विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी आहे, पण एकदा का युद्ध सुरु झालं की, जो-जो येईल त्याला आडवा करु.' असा गर्भित इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला. 'आमचा शिवसेनेसोबत युती करण्याचा मानस आहे. ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर.' माझा कट्ट्यावर बोलताना रावसाहेब दानवेंनी महापालिका निवडणुकांतील भाजपच्या धोरणावर बोलताना हे वक्तव्य केलं.

'आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहेच'

'आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहेच. पण ती पारदर्शी कारभारावर. युती न करण्याचा काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पण 25 वर्षाबरोबरच्या मित्राला सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चर्चाही सुरु आहेत. दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत. त्यामुळे काही प्रमाणात मतभेद असतात. पण तरीही आमचा युतीचा मानस आहे.' असं युतीबाबत मत रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलं.



'ज्याच्या जास्त जागा त्याचाच महापौर'

'युती जरी झाली तरी ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर हा पहिला फॉर्मुला असणार आहे. बाळासाहेब आणि प्रमोद महाजन असल्यापासून आमची ही समीकरणं ठरली होती. पण आता भाजपची ताकद वाढत आहे. त्यामुळे भाजपनं जास्त जागाची मागणी करणं साहजिक आहे. पण आमचा युती करण्याचा मानस आहे.' असंही दानवेंनी स्पष्ट केलं.

'राज्यात भाजपच मोठा भाऊ'

'राज्यात आजच्या घडीला भाजप हाच मोठा भाऊ आहे. आज महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार आमचे, सर्वाधिक आमदार आमचे, इतेकच नव्हे तर सर्वात सरपंचही आमचेच आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा की कोण मोठा भाऊ? आमची बाहेर होणारी भांडणं वेगळी  आहेत.  पण सरकारमध्ये काम करीत असताना आमची कुठल्याच मुद्द्यावर भांडणं होत नाहीत. त्यामुळेच आमचा कायमच पारदर्शी कारभाराचा आग्रह राहिला आहे.' असं रावसाहेब दानवे म्हणाले.

'लक्ष्मीचा अर्थ पैसाचा असा होत नाही'

'लक्ष्मीचा अर्थ पैसाचा असा होत नाही. पण ग्रामीण भागातील जनतेला जिंकून घ्यायचं असेल तर त्यांना समजेल अशा भाषेत बोलावं लागतं. पण तरीही माझ्या वक्तव्यावबद्दल खटला दाखल झाला आहे. पाहू आता कोर्टात त्याचा निकाल काय लागतो ते?' लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्यावर दानवेंनी असं उत्तर दिलं.



'केंद्रातलं मंत्रीपद मी स्वत:हून सोडलं नाही'

'मला मुख्यमंत्री व्हायचमं म्हणून मी राज्यात परत आलेलो नाही. केंद्रातलं मंत्रीपद मी स्वत:हून सोडलं नाही, पक्षानं मला आदेश दिला की राज्यात काम करावं लागेल. मी ते मान्य केलं आणि राज्यात परत आलो. पक्षाच्या आदेशानुसारच मी सध्या काम करतो आहे.' असं दानवे म्हणाले

'आम्ही जिंकत असलो तरीही आमच्यात घमेंड नाही'

'आम्ही जिंकत असलो तरीही आमच्यात घमेंड नाही, आम्ही देशात लोकसभा जिंकलो, अनेक ठिकाणच्या विधानसभा जिंकलो, राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका जिंकलो. पण तरीही आमच्यात अजिबात घमेंड नाही. भाजप हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे यापुढच्या निवडणुकाही त्याच पद्धतीनं लढून आम्ही विजय मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत.' असं दानवेंनी उत्तर दिलं.



'नोटाबंदीच्या निर्णयानं लोक खूश आहेत'

'नोटाबंदीच्या निर्णयानं लोक खूश आहेत,  लोक जर  नाराज असते तर नगरपालिका निवडणुकीत लोकांनी आम्हाला त्याचा निकाल दाखवून दिला असता. पण लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. आम्ही मोठ्या लोकांच्या नोटा बंद केल्या. त्यामुळे सामान्य लोकांना काहीही त्रास झाला नाही. यापूर्वी देशात वस्तूविनिमय पद्धतच लागू होती. पण काँग्रेस सरकारनं हा सारा चलनाचा मामला सुरु केला.ट असं म्हणत दानवेंनी काँग्रेसवर टीका केली.

'सेल्फीमुळे 80% वेळ लोकांसोबत फोटो काढण्यातच जातो'

'आज प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. त्या सेल्फीमुळे तर जवळजवळ 80% वेळ लोकांसोबत फोटो काढण्यातच जातो. पेट्रोल पंपवर थांबलो तरीही लोकं सेल्फी घेतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीसोबत जर माझा फोटो असला आणि ती व्यक्ती जर गुंड प्रवृत्तीची असली तर त्यात माझा नेमका दोष काय?' असा सवालही दानवेंनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या:

युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंची सेना मंत्र्यांसोबत तातडीची बैठक

...म्हणून युती गरजेची, खलबतांनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत

स्वबळावर लढल्यास भाजपला 100+ जागा, पक्षाच्या सर्वेक्षणाचा अंदाज

मुंबईत राष्ट्रवादीसोबत आघाडी अशक्य: संजय निरुपम