Ramzan Eid 2023: मुस्लिम धर्मीयांचा सर्वात मोठा सण रमजान ईद म्हणजेच ईद उल फित्र आज देशभरात साजरा केला जातोय. महिनाभर उपवास ठेवल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने आज ईद साजरी केली जाते. मात्र सद्या वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेत राज्यातील अनेक भागात ईदच्या नमाजीच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. सकाळी 10 पासूनच बऱ्याच ठिकाणी उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यातल्या त्यात ईदची नमाज ईदगाहवर म्हणजेच मोकळ्या मैदानात अदा केली जाते. यावेळी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत ईदच्या नमाजीत सामील होतात. त्यामुळे वाढती उष्णता पाहता 9 ते 9.30 या वेळेत अनेक ठिकाणी नमाज अदा केली जाणार आहे. 


सोलापूरमध्ये अर्धा तास आधी नमाज होणार!


सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढतोय. त्यामुळे सोलापूर शहरातील ईदगाहवर होणाऱ्या नमाजचा वेळ बदलण्यात आला आहे. यापूर्वी सोलापूर शहरातील ईदगाहाच्या मैदानावर 9 वाजता ईदची नमाज होत होती. मात्र आता यावर्षी उन्हाचा पारा लक्षात घेता 8.30 वाजता नमाज पठण केली जाणार असल्याची माहिती शहर काझी यांच्याकडून देण्यात आली आहे. सोबतच नमाजसाठी घरून येताना काहीतरी थोडाफार खाऊन यावं,सोबत पाण्याची बॉटल घेऊन यावं, डोक्यावर मोठं रुमाल घेऊन यावं, लहान मुलांची काळजी घ्यावी,तसेच उन्हापासून वाचण्यासाठी जे काही शक्य आहे ते सर्व करण्याचं आवाहन देखील काझी यांनी केलं आहे. 


नके ठिकाणी नमाज पठणच्या वेळेत बदल


राज्यातील अनेक जिल्ह्यात सद्या उन्हाचा पारा वाढतोय. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. सकाळी साडेनऊ वाजेपासून उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. त्यात मुस्लिम धर्मियांची आज होणाऱ्या ईदची नमाज अनेक ठिकाणी 10 वाजेपर्यंत पठण केली जाते. मात्र उन्हाचा चटका पाहता नामजच्या वेळेत बऱ्याच ठिकाणी बदल करण्यात आला आहे. विशेष करून खुल्या मैदानात होणाऱ्या नमाजच्या वेळेत बदल करण्यात आले आहे.


आज मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद आहे. देशभरात रमजान मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय... चंद्राचं दर्शन झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.  ईद च्या पार्श्वभूमीवर गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय.  तर तिकडे राजधानी दिल्लीत जामा मशिदीत आज सकाळच्या नमाजसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या :