रामराजेंपाठोपाठ उदयनराजे सर्किटहाऊसवर, साताऱ्यात वातावरण तापलं
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2018 05:36 PM (IST)
रामराजे निंबाळकर साताऱ्यातील सर्किट हाऊसला असताना खासदार उदयनराजेही सर्किट हाऊसला दाखल झाले आहेत. यामुळे सर्किट हाऊस परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
सातारा : रामराजे निंबाळकर साताऱ्यातील सर्किट हाऊसला असताना खासदार उदयनराजेही सर्किट हाऊसला दाखल झाले आहेत. यामुळे सर्किट हाऊस परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी नुकताच 24 जून रोजी पुन्हा एकदा रामराजे निंबाळकरांवर निशाणा साधला होता. फलटणच्या दौऱ्यावर असताना आपल्या समर्थकांशी ते बोलत होते. रामराजेंना कोणत्याही व्यासपीठावर बोलवा, त्यांना असणाऱ्या प्रत्येक आक्षेपांची उत्तरं देईन, असं आव्हान उदयनराजेंनी निंबाळकरांना दिलं आहे. रामराजेंसारख्या लोकांमुळेच इतरांचं फावतं, असं म्हणत कुठं मालोजीराजे आणि कुठं रामराजे निंबाळकर असंही उदयनराजे म्हणाले. फलटणचं वैभव बदलायचं असेल तर तुमच्यातला फक्त एका जणानं तयार व्हा, असं आवाहनही त्यांनी आपल्या समर्थकांना केलं. दरम्यान उदयनराजेंच्या उपस्थितीमुळे साताऱ्याच्या सर्किट हाऊस परिससरातील वातावरण तापलं आहे. काही वेळातच एसपी संदीप पाटीलही सर्किट हाऊसवर दाखल होणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्किट हाऊसला पोलिस छावणीचे स्वरूप आलं आहे.