Ramdev Baba : राज्यातील मशिदींवरील भोंगे खाली उतरवले नाहित तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करू या राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या भूमिकेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता या वादात बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनीही उडी घेतली आहे. देव बहिरा नाही, त्यासाठी मोठे लाऊडस्पीकर लावायची गरज नाही. सर्वांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढावा, असे आवाहन बाबा रामदेव यांनी केले आहे.
मशिदींवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर राज्यभरातून विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता बाबा रामदेव यांनीही यावर आपली भूमिका मांडली आहे.
"ध्वनी, वायू , वैचारिक आणि सांप्रदायिक प्रदूषण महाराष्ट्र आणि राष्ट्रासाठी घातक आहे. एक समुदाय वर्षानुवर्षे गैर मुस्लिम वर्गालाच्या कानात मोठा आवाज करत आहे. परंतु, या विषयी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. देव बहिरा नाही, त्यासाठी मोठे लाऊडस्पीकर लावायची गरज नाही. सर्वांनी एकत्र येऊन या प्रश्नावर सामंजस्याने मार्ग काढणे गरजेचे आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मशिदीवर किंवा अन्य ठिकाणी जे भोंगे लावले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समाजाला त्रास होतो. भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे. हा फक्त मशिदीवरील भोंगे असा विषय नाही. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा, तो रस्त्यावर आणू नये. भोंग्यांचा त्रास फक्त हिंदुंनाच नाही तर मुस्लिमांनाही होतो. त्यांनी जर पाचवेळा भोंगा लाऊन अजान म्हटली तर आम्ही देखील पाचवेळा मशिदींसमोर आरती म्हणू अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या