Gajanan Kirtikar vs Ramdas Kadam :  शिवसेना शिंदे गटातील नेते, खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) आणि माझ्यातील वाद आता मिटला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते  रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. गजाभाऊंच्या आरोपांमुळे आपण व्यथित झालो असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर हेच उमेदवार असतील तर चुकीचे काय, असा उलट प्रश्नही कदम यांनी केला. 


मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा जागेसाठी रामदास कदम यांनी आपला मुलगा सिद्धेश कदम हा उमेदवार असेल असे म्हणत दावा केला. त्यानंतर मागील काही दिवसांपासून खासदार गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यात वादाचे फटाके फुटत आहेत. रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर टीका करताना थेट त्यांच्या खासगी जीवनावर टीका केली. 


पक्षातील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेत गजानन कीर्तीकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर वर्षावर रामदास कदम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बोलताना रामदास कदम यांनी म्हटले की, आमच्यातील वादावर पडदा पडला आहे. गजानन कीर्तीकर यांनी थेट प्रेस नोट काढण्यापेक्षा मुख्य नेत्यांसोबत चर्चा करावी असेही कदम यांनी म्हटले. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत आणि भविष्यात पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांच्या प्रचाराला जाऊ असेही कदम यांनी स्पष्ट केले. 


कीर्तीकरांवर खासगी टीका योग्यच...ज्याची जळते त्यालाच कळते; कदमांनी व्यक्त केली खदकद


गजानन कीर्तीकरांच्या खासगी आयुष्यावरून केलेल्या टीकेचे रामदास कदम यांनी समर्थन केले. खासगी टीका करणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास कदमवर गद्दारीचा आरोप करणे हे कितपत योग्य आहे, रामदास कदमला संपवण्यासाठी प्रेसनोट काढणे किती योग्य असा प्रश्नच कदम यांनी केला. 30 वर्षानंतर मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला, हे आता कळलं का. ज्याची जळते त्याला कळते अशा शब्दांत आपली खदखद व्यक्त करत कदम यांनी आता वाद संपला असल्याचे म्हटले.