हत्या झालेल्या कार्यकर्त्यांची कुटुंबाची पूर्ण जबादारी शिवसेना घेणार असल्याची माहितीही रामदास कदम यांनी दिली.
भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस तिघांच्या संगनमताने ही हत्या झाल्याचं मला समजलं आहे, असं रामदास कदम म्हणाले. जगताप, कर्डिले आणि कोतकर या प्रकरणात आरोपी आहेत. संघटित गुन्हेगारी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे, अशी मागणी कदमांनी केली.
अशा प्रकारच्या हत्या बिहारमध्येही होत नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचंही कदमांनी सांगितलं. जर भविष्यात ती राखली जाणार नसेल, तर शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गुंडांची हिंमत पोलिसांच्या संगनमतामुळे होत असल्याचं कदम म्हणाले. या हत्या पोलिसांच्या साक्षीने झाल्यामुळे शिंदे आणि परमार या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणीही रामदास कदमांनी केली.
उद्याच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.
यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. एकीकडे म्हणायचं युती करायची आहे, आणि इथे शिवसेनेच्या मुळावर घाव घालायचा, असा आरोपही रामदास कदम यांनी केला.
अहमदनगर जिल्ह्यात तणावाचं वातावरण असताना पालकमंत्री राम शिंदे मात्र शिर्डीत मालपाणींच्या थीम पार्कच्या उद्घाटनासाठी गेले होते. 'याबाबत काही बोलणार नाही. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करु' असं उत्तर रामदास कदम यांनी दिलं.
काय आहे प्रकरण?
बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मधल्या पोटनिवडणुकी दरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला.
आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम जगतापांसह विजयी उमेदवार असलेल्या विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांना शनिवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यानंतर रविवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेनं अहमदनगर बंदची हाक दिल्यानंतर रस्त्यांवर कडकडीत बंद पाळल्याचं चित्र पाहायला मिळालं. अहमदनगर शहरात शिवसेनेने निषेध मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते.
सर्व आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत दोन्ही शिवसैनिकांच्या पार्थिवाचे अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचं शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी सांगितलं.
पाहा संपूर्ण पत्रकार परिषद :