यापुढे कधीही निवडणूक लढवणार नाही : रामदास कदम
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2016 04:14 PM (IST)
रत्नागिरी : शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यापुढे कधीही निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे केवळ पक्षासाठी काम करणार असल्याचं आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय. तरुण रक्ताला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कदम यांचा दावा आहे. मात्र राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा आहे. कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली विधानसभेसाठी इच्छुक असून, मुलासाठी रामदास कदम यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर कायमच विश्वास ठेवला. मला महाराष्ट्राचा मंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. मात्र यापुढे तरुणांना संधी मिळावी यासाठी मी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे", असं रामदास कदम म्हणाले.