Ramdas Athawale On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सभेआधीच राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. यावरुन वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी' असं आवाहन केलं आहे.  नांदेडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. 


आठवले म्हणाले की, राज यांनी दौरा रद्द केला, याचे स्वागत आहे.  त्यांनी दौरा रद्द केलाय ही चांगली गोष्ट आहे. त्याठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करुन जाणे काही योग्य नाही.  उत्तर भारतीयांचं म्हणणं असं आहे की, त्यांनी माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं. राज ठाकरे हे हिंदू आहेत, त्यांना राममंदिर बघायला जाण्याचा अधिकार आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतरच त्याठिकाणी जायला काही हरकत नाही, असं ते म्हणाले. 


कट्टर हिंदुत्व कुणाचं आहे हे सिध्द करण्यासाठी सगळ्याच पक्षांची स्पर्धा 


रामदास आठवले म्हणाले की, कट्टर हिंदुत्व कुणाचं आहे हे सिध्द करण्यासाठी सगळ्याच पक्षांची स्पर्धा आहे. माझ्या नजरेतून हिंदू धर्माला मजबूत करण्याचे काम शिवसेनेपेक्षा भाजप जास्त करते. हिंदू धर्माला मजबूत करत असताना इतर धर्मियांना सोबत घेऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' अशी घोषणा घेऊन BJP सार्‍या देशामध्ये मोठ्या प्रमाणात विजय संपादन करत आहे. त्यामुळे हिंदू समाज त्यांच्या पाठिशी आहेच, पण इतर समाजही भाजप सोबत आहे. तर दलित समाज हा आठवले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासोबत आहे. मुस्लिम समाज हा जसा पूर्वी भाजपला विरोध करायचा, तो तेवढ्या प्रमाणामध्ये विरोध करत नाही. त्यामुळे BJP ला मोठ्या प्रमाणात सगळ्या राज्यांमध्ये यश मिळत आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे. 
 
आठवलेंना तलवार भेट 


नांदेडमधील सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री रामदास आठवले यांना भाजपचे आमदार राजेश पवार यांनी तलवार भेट दिली.  ही तलवार आठवले यांनी म्यानातून काढून दाखवली.  नांदेड जिल्ह्यातील नायगाव-उमरी मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पवार यांनी आठवलेंच्या स्वागताचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी ही तलवार भेट दिली.  खुद्द केंद्रीय मंत्र्यांना अशा पध्दतीने तलवार भेट देणे आणि ती स्वीकारणे यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.