चंद्रपूर: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होतायत, असं वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला होता. बडोलेंच्या या वक्तव्याचा विरोधकांनी निषेध करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. पण दुसरीकडे मात्र केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बडोलेंच्या त्या वक्तव्याला समर्थन दिलंय.

चंद्रपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बडोलेंच्या वक्तव्याचं समर्थन करुन ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांचे मोर्चे यशस्वी होतायत, हे बडोले यांचे मत वस्तुस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली आहे.

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्याला मराठा समाजाकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असताना, मंत्र्यांनीच या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन वाद निर्माण केला आहे.

याशिवाय मराठा आरक्षणासाठी राज्यातल्या मराठा खासदारांनी संसद अधिवेशनात केंद्रीय स्तरावर हा विषय उचलला पाहिजे, असं मतही आठवलेंनी यावेळी व्यक्त केलं.

तसेच शनिवारी कोल्हापुरातील मराठा समाजाच्या मोर्चाला विक्रमी गर्दी झाल्यानंतर कोल्हापुरात 11 नोव्हेंबर रोजी दलित-मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या

पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत: राजकुमार बडोले

राजकुमार बडोलेंसारख्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करा: छत्रपती संभाजीराजे

बडोलेंच्या बुद्धीची कीव येते : उदयनराजेंचा हल्लाबोल