मुंबई : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते राम नाईक (Ram Naik) यांनी राज्याच्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा (Fisheries Development Policy Committee) राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राचं मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव राम नाईक यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीकडे राजीनामा सुपूर्त केला.
राम नाईक हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी केंद्रात मंत्रिपद आणि नंतर उत्तर प्रदेशचे राज्यपाल पद भूषवलं आहे. जानेवारी 2025 पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता प्रकृती स्थिर असली, तरी अजूनही संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला असल्याने राम नाईक यांनी हा राजीनाम्याचा निर्णय (Ram Naik Resigns ) घेतला.
मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव आणि समितीपुढे आलेल्या सूचना यामुळे मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे ही काळाची गरज असल्याचं मत राम नाईक यांनी व्यक्त केलं होतं. योगायोगाने समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हाच निर्णय घेतला. त्यामुळे महत्त्वाचे काम झालेच आहे, धोरण निश्चिती संदर्भातील अन्य कामांना अधिक विलंब नको या हेतूने राम नाईक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आपल्या राजीनामा पत्रात राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नीतेश राणे यांचे आभारही मानले आहेत.
प्रकृती अस्वास्थ्य असताना राजीनामा प्रत्यक्ष घेऊन येऊ नका, मीच माझा प्रतिनिधि पाठवितो असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम नाईक यांना दिला.
ही बातमी वाचा: