नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतविरोधात भूमिका घेणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाऊंटवरही भारताने बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. आता केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याने टीव्ही चॅनेल्ससाठीही काही निर्देश दिले आहेत. भारतातील कोणत्याही चॅनेलवर पाकिस्तानी व्यक्ती किंवा पॅनलिस्टला चर्चेसाठी बोलवू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने हे निर्देश एनबीडीएला (News Broadcasters & Digital Association) दिले आहेत. एनबीडीएने या संदर्भात सर्व संपादकांना एक मार्गदर्शिका जारी केली आहे. 

Pakistani Panelist Ban In India : काय म्हटलंय एनबीडीएने?

पहलगाम दहशतवाही हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही चॅनेलने पाकिस्तानी तज्ज्ञ, पॅनलिस्ट किंवा इतर कुणालाही चर्चेसाठी आमंत्रित करु नये. आपल्या चॅनेलचे व्यासपीठ भारतविरोधात गरळ ओकण्यासाठी, भारतविरोधी भूमिका मांडण्यासाठी (Anti India Propaganda) उपलब्ध करुन देऊ नये. या अशा लोकांमुळे भारतातील सार्वभौमत्व, एकात्मका आणि सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. 

सर्व चॅनेल्स आणि डिजिटल माध्यमांच्या संपादकांना विनंती  आहे की त्यांच्या व्यापपीठाचा भारतविरोधी खोटा प्रचार करण्यासाठी उपयोग करू देऊ नये. 

 

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा जीव गेला. त्यानंतर या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काही चॅनेल्सकडून पाकिस्तानी पॅनलिस्टना आमंत्रण देण्यात आलं होतं. पाकिस्तानी पॅनलिस्टनी त्यांची खोटी भूमिका मांडत भारतीय चॅनेल्सचा वापर भारतविरोधी भूमिका मांडण्यासाठी केल्याचं दिसून आलं. त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने या संबंधी काही नियमावली जारी केली आहे. यापुढे चॅनेल्स असो वा डिजिटल मीडिया असो, कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला चर्चेसाठी बोलावता येणार नाही. त्यामुळे भारत विरोधी खोट्या प्रचाराला आळा बसेल.