केंद्र आणि राज्य सरकारच्या गेल्या अडीच-तीन वर्षांच्या कामगिरीची माहिती गावोगावी पोहोचवण्यासाठी शिवार संवाद सभेच्या निमित्ताने आमदार राम कदम हे सध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुळाशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असून, तेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला. शिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेले पाप आम्ही निस्तरतो आहोत, असेही आमदार राम कदम म्हणाले.
शरद पवारांवर राम कदमांची टीका
“शरद पवार यांची विद्वत्ता आम्हाला मान्य आहे. मात्र, राजकीय दुकानदारी संपतेय की काय, अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. पक्ष फुटीच्या भीतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष गोरगरीब शेतकऱ्यांना पुढे करुन शेतकरी संप करत आहेत", असा घणाघात राम कदम यांनी केला.
“दीड महिन्यांपूर्वी नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली. या पराभवाच्या नैराश्येतून त्यांनी संप केला आहे. भावनिक तेढ, संभ्रम निर्माण करण्याचे शिखंडीचे काम सध्या ते करत आहेत. शेतकरी संप हे या दोन्ही पक्षासह आमच्या मित्रपक्षाचे सुनियोजित षडयंत्र आहे.” असे राम कदम म्हणाले.
शिवसेनेवरही टीकास्त्र!
“शिवसेना डबल ढोलकी आहे. दोन्ही बाजूने वाजवत आहेत. जबाबदारी घेण्याची वेळ आल्यावर ती झटकून टाकण्याचे काम शिवसेना करते आहे. त्यांनी ही दुतोंडी भूमिका सोडावी. त्यांनी जबाबदारी झटकली, तरी आम्ही ती झटकू शकत नाही.”, अशी टीका राम कदम यांनी शिवसेनेवर केली.