Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) जाहीर होताच आता सर्वच पक्षाच्या हालचाली देखील वाढू लागल्या आहेत. महायुतीने तशी तयारी देखील सुरू केली असून, पाच जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठीचा निर्धार महायुतीने केला आहे. 


निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. भाजपने तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे. 


राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे हे उत्तम जबाबदारी पार पाडत असल्याचे भाजपच्या नेत्यांचे मत आहे.बिहारच्या सत्तांतरात त्यांनी बजावलेली भूमिका आणि हरयाणात केलेली कामगिरी  
याचं बक्षीस त्यांना मिळेल असा अंदाज बांधला जात आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर नाराज असलेल्या ओबीसी समजाची नाराजी दूर करण्यासाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची भाजप रणनीती भाजपने आखली आहे. 


एकीकडे भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील याचीही चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळू शकते असा अंदाज आहे.तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.


राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील 287 आमदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीत विजयासाठी 42 मतांचा कोटा आवश्यक आहे. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत 16 आमदार आहेत. तर, राष्ट्रवादीतील 42 आमदार हे अजित पवारांसोबत आहेत. राज्यसभेच्या 6 पैकी पाच जागा जिंकून आणत महायुती अभेद्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षाचा असणार आहे. त्यामुळे महायुतीला किती यश मिळतेय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


व्हीप ठरणार कळीचा मुद्दा :


व्हीपच्या मुद्यावरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल आमदार अपात्रता सुनावणीत दिला होता. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल अपेक्षित आहे.  तर, दुसरीकडे ठाकरे गटाने आम्हाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार नसल्याचा दावा केला आहे. 



महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल काय?


भाजप : 104, राष्ट्रवादी (अजित पवार गट): 42  शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 40, काँग्रेस : 45, शिवसेना उद्धव ठाकरे गट :16 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 11, बहुजन विकास आघाडी : 3, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी दोन आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी एक आमदार आणि अपक्ष 13 आमदार


महाराष्ट्रातील सहा खासदार निवृत्त - 


राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.