शिर्डी: भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे. शेतकऱ्यांच्या बायका काय रस्त्यावर पडल्या आहेत का? मुख्यमंत्र्यांच्या घरातल्या बाईकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं असतं, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केला.

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली.

बुलडाण्यात पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. याप्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर राजेश हिवसेला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली.

या प्रकारावरुन खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं.

राजू शेट्टी काय म्हणाले?

“भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे. ते शेतकऱ्यांच्या बायकांकडे वाकडया नजरेने बघत आहेत.एव्हढं हिन कृत्य करुनदेखील बँक अधिकाऱ्याला एका दिवसात जामिन मिळतोच कसा? देवेंद्र फडणवीस तुमच्या घरातल्या बाईकडे असं कोणी वाकड्या नजरेने बघितलं, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? आमच्या शेतकऱ्याच्या बाया काय रस्त्यावर पडल्या आहेत का? तुमचं गृहखातं काय करतं? पुरावे असताना पोलिसांनी ही केस कोर्टासमोर सक्षमपणे मांडली नाही” असं राजू शेट्टी म्हणाले.

शेतकरी पाकिस्तानपेक्षा वाईट

या सरकारला शेतकरी पाकिस्तानपेक्षा वाईट वाटतो. शेतकऱ्याला जेव्हा चार पैसे मिळतात, तेव्हा हे सरकार शत्रूराष्ट्रासोबत हात मिळवतात आणि देशातील शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत लोटतात. हेच का या सरकारचं देशप्रेम? असा सवाल राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला विचारला.

29 जूनला पुण्यात मोर्चा

उद्या म्हणजेच 29 जून पुण्यात भव्य मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल. शनिवार वाड्याच्या शेंडीला जाळ लागावा, यासाठी पुण्यातच मोर्चा आयोजित केला आहे.

शेती व्यवसायाचं वाटोळ करणाऱ्यांना कळलं पाहिजे, म्हणून हा मोर्चा आहे. भाजपासोबत गेलो याची लाज वाटते, असंही राजू शेट्टी म्हणाले.

संबंधित बातम्या 

पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारा बँक अधिकारी अटकेत   

शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित  

पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी प्रकरण, प्रशासनाकडून गंभीर दखल  

पीक कर्जासाठी बँक मॅनेजरकडून शरीरसुखाची मागणी