प्लास्टिकबंदीविरोधात 'हिरोगिरी' करणाऱ्या शिवसैनिकाला तुरुंगवारी
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2018 11:02 AM (IST)
प्लास्टिक आढळल्यामुळे दंड आकारणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याला दमदाटी केल्या प्रकरणी शिवसैनिकाला नांदेड पोलिसांनी तुरुंगवारी घडवली.
नांदेड : शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांच्या पुढाकाराने सुरु केलेल्या प्लास्टिकबंदीला विरोध करणं एका शिवसैनिकालाच महागात पडलं आहे. प्लास्टिक आढळल्यामुळे दंड आकारणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याला दमदाटी केल्या प्रकरणी शिवसैनिकाला नांदेड पोलिसांनी तुरुंगवारी घडवली. नांदेड शहरातील पीर बुऱ्हाणनगर भागात एका दूध विक्रेत्याजवळ बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या. पालिका कर्मचाऱ्याने नियमानुसार त्याला पाच हजार रुपयांचा दंड आकारला. पण या ठिकाणी हिरोगिरी करण्यासाठी शिवसैनिक शेख अफजल धावून आले. पालिका कर्मचाऱ्याला शिवसैनिकाने दमदाटी केली. इतकंच नाही तर या प्रकाराचा व्हिडिओ त्याच्या समर्थकाने शूट केला आणि शेखने तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. पालिका आयुक्त लहुराज माळी यांनी या प्रकारची गांभीर्याने दखल घेतली. शिवसैनिक शेख अफजल विरोधात भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्लास्टिकबंदीला विरोध करणाऱ्या शिवसैनिकाला पोलिसांनी कोठडी दाखवली.