Raju Shetti on Shaktipeeth Mahamarg :  कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आलं आहे. तसा आदेश राज्य सरकारने पारित केला आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शक्तिपीठ महामार्गामधून केवळ कोल्हापूरला वगळण्याचा हा लढा नव्हताच, तर वर्ध्यापासून पत्रादेवीपर्यंत पूर्ण शक्तिपीठच महामार्गच रद्द व्हावा अशी आमची मागणी असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

Continues below advertisement

शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा प्रकल्प आहे. त्यामुळं राज्य सरकारने तो रद्द करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.  देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवण्याची परंपरा मोदींनंतर तशीच कायम ठेवलेली दिसत असल्याचे शेट्टी म्हणाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्गातून वगळल्याचं नोटिफिकेशन काढलेलं होतं. मात्र आता पुन्हा एक नोटिफिकेशन काढलं आहे. यामध्ये पवनार ते पत्रादेवी हा महामार्ग 802 किलोमीटरचा होणार आहे. त्यापैकी सांगलीपर्यंत महामार्गासाठी शासनाने परवानगी दिली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पर्यायी मार्ग सुचवण्याचे आदेश पारित केले आहेत. पर्यायी मार्गाने देखील शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असे राजू शेट्टी म्हणाले. 

शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध

शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी याला विरोध केल्याचं दिसतंय. माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या प्रश्नी आवाज उठवला. त्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव आणि इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही या महामार्गाला विरोध केला. कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीतून होऊ नये, त्यासाठी आमच्या शेतजमिनी देणार नाही अशा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याचं दिसतंय. कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता राज्य सरकारने आता या ठिकाणची भूसंपादन प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीडलातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. पहिल्या टप्प्यात वर्ध्यातील पवनार ते सांगली अशा भूसंपादनेला मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Shaktipeeth Expressway : मोठी बातमी! शक्तिपीठच्या भूसंपादनेतून कोल्हापूरला वगळलं, लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेणार