Raju Shetti : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. या 12 जणांच्या यादीत जर माझे नाव असेल तर ते नाव वगळावे अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटचनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली. आज राजू शेट्टी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  


दरम्यान, 5 एप्रिलला जी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीसोबत असणारे संबंध तोडायचे असे आम्ही ठरवले असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. एका बाजूला सरकारच्या धोरणांना विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला सरकारने सुचवलेल्या विधानपरिषद सदस्यत्व स्विकारणे हे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. त्यामुळं मी राज्यपालांना भेटून या 12 नावांच्या यादीतून माझं नाव वगळावं अशी विनंती केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.


मला आता विधानपरिषदेचा सदस्य होण्यात कोणताही रस नसल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी सर्व निवडणुका स्वाभिमानी पक्षाच्या बॅनरखाली लढवणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विचारांशी बांधील राहून, जनतेच्या हितासाठी जे उमेदवार निवडणूक लढवू इच्छित आहेत, त्यांना संधी दिली जाईल अशी माहितीही स्वाभिमानीकडून देण्यात आली होती.


दरम्यान, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार सत्तेत आलं होतं. साताऱ्यातल्या सभेत पवार साहेब यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला. तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते. मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील जात नाही. ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काहीही संबंध नसलेले लोक घेतले. आमदाराच्या पुढ्यात बोलणार नाहीत ते कारखानदार यांच्यासमोर काय बोलतील, असे म्हणत शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजू शेट्टी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून नाव वगळण्याची विनंती केली आहे.
  


महत्त्वाच्या बातम्या: