औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी कर्जमाफीवरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला रावणाची उपमा दिली, तर सदाभाऊ खोतांना हनुमानाची उपमा देत निशाणा साधला. सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसून, ते रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.  ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.


सदाभाऊंवर निशाणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर खासदार राजू शेट्टी यांनी नाव घेता निशाणा साधला. "आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला होता, मात्र तोही शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला.", अशी टीका राजू शेट्टींना सदाभाऊंवर केली.

सरकारवर टीका

सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पेसै देण्याची मानसिकताच नसल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. "कर्जमाफीचे पैसै देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरु आहे. जमेल तोपर्यंत लांबवायचे आणि निवडणुका जवळ आल्या की पैसै द्यायचे, असे राजकारण सरकार करत आहे. मात्र शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा डाव आम्ही उलटवून लावू", असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना हनुमान उद्देशून टीका केल्यानंतर पुन्हा वाद उभा राहण्याची चिन्ह आहेत. सदाभाऊंनी आता वेगळी चूल मांडली असली, तरी त्यांनी नेहमीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजू शेट्टींवर टीका केली आहे. मात्र आता शेट्टींच्या विधानावर सदाभाऊ काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.