Raju Shetti on Devendra Fadnavis : आज विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 80 हजार मेट्रीक टनापेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या महत्त्वाच्या बाजार समिती अध्यक्षपदी मंत्री आणि उपाध्यक्षपदी राज्यमंत्री तर सदस्य म्हणून काही आयएएस अधिकारी व दोन ते तीन शेतकरी प्रतिनिधी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर सडकून टीका केली.
इथेही लुटता यावे म्हणून मंत्री राज्यमंत्री नेमता काय?
सगळा महाराष्ट्र लुटून झाला आता शेतकऱ्यांच्या बाजार समिती तरी शिल्लक ठेवा असे शेट्टी म्हणाले. इथेही लुटता यावे म्हणून मंत्री राज्यमंत्री नेमता काय? असा सवाल त्यांनी केला. यात आयएएस अधिकाऱ्यांचे आम्ही स्वागत करू मात्र मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे इथे काय काम अशी टीका त्यांनी केली. जर मंथनियन राज्यमंत्री नेमत असेल तर शेतकऱ्यांनी मते देऊन निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे काय असा सवाल करताना बाजार समिती या चराऊ कुरणे आहेत. त्यात फक्त चरण्याचा अधिकार या पांढऱ्या हत्ती सारख्या पोसलेल्या मंत्र्यांचा आहे का ? असा संतप्त सवालही त्यांनी केला. सरकारने या घेतलेल्या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर : राजू शेट्टी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. गेल्या सहा दिवसापासून पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथंऊस दरासाठी सुरु असलेले आमरण उपोषण राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत सुटले. यानतर बोलताना राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 15 रुपये द्या नाहीतर काटामारी बाहेर काढू असे म्हणणारे मुख्यमंत्री हेच सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याचे शेट्टी म्हणाले. ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी यासाठी गेल्या सहा दिवसापासून समाधान फाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाखरी येते आमरण उपोषण सुरू केले होते. आज जिल्ह्यातील 15 पेक्षा जास्त साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केल्यानंतर राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी आंदोलकांना लिंबू पाणी देत त्यांचे आमरण उपोषण सोडवले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर सडकून टीका केली.