Raju Shetti : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, अद्याप ते पैसे जमा झाले नाहीत. सध्या सुरु असलेल्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं आहे. तत्कालीन राज्य सरकारनं जाहीर केलेलं प्रोत्साहनपर अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या विरोधात येत्या 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापूरमधील दसरा चौकात एकत्र येण्याच आवाहन राजू शेट्टींनी केलं आहे.  गट-तट, पक्ष विसरुन निर्णायक लढाईसाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात उपस्थित राहा असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.


नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं दोन वर्षापूर्वी केली होती. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वेळोवेळी मागणी केली. मोर्चा काढला. त्यानंतर मार्च 2022 च्या बजेटमध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. हे पैसे 1 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते. परंतू, दुर्दैवानं, त्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता नवं आलेलं सरकार म्हणत आहे की, मागील सरकार हे अल्पमतात होतं, त्यांच्या निर्णयाची अमंलबजावणी करणार नाही. त्यांच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. पावसाळ्याचे दिवस आहेत. खताला पैसे नाहीत, बियाणाला पैसे नाहीत. आर्थिक अडचण आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्काचे 50 हजार रुपये खात्यावर आले असते तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता असे शेट्टी म्हणाले. त्यामुळं आता सरकारवर दबाव टाकण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


एकूण 10 हजार कोटीपैकी एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला 987  कोटी रुपये येणं आहे. म्हणजे 10 टक्के रक्कम कोल्हापूर जिल्ह्याला येणार आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात मोठा उठाव होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं गट तट विसरुन एकत्र या. गटात तटात आता काय राहिले आहे. कोण कोणालाही मिठी मारत असल्याचे शेट्टी म्हणाले. त्यामुळं 13 तारखेला दसरा चौकात एकत्र या असे आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. आपण आळस केलं तर नुकसान आपलचं होणार आहे. ही निर्णायक लढाई आहे. तुम्ही साथ दिली तर यापेक्षाही मोठी लढाई मी करणार असल्याचे शेट्टी म्हणाले. सगळेजण मिळून हे पैसे वसूल करु असे शेट्टी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: