...तर हनुमान काय कामाचा?, राजू शेट्टींचा सदाभाऊंना खोचक टोला
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2017 06:53 PM (IST)
मुंबई : सीता संकटात असताना हनुमान मदतीला धावून येत नसेल, तर तो हनुमान काय कामाचा?, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना खोचक टोला लगावला आहे. खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्त्वातील आत्मक्लेश यात्रा राजभवनावर धडकली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. सदाभाऊ काय म्हणाले होते? मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे, तिथं मी शेतकऱ्यांचेच प्रश्न मार्गी लावतोय, असं कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. सरकारकडून कोणीही चर्चेसाठी येत नाही : शेट्टी कर्जमाफीच्या मागणीचे साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या सहीचे फॉर्म राज्यपालांना दिले, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली. शिवाय, चर्चेची दारं उघडी आहेत, मात्र सरकारकडून कोणीही चर्चेसाठी समोर येत नाही, असेही त्यांनी सांगितले. पवार समृद्धी महामार्गाविरोधात उतरणार, ही चांगली गोष्ट : शेट्टी "शरद पवार समृद्धी महामार्गाच्या विरोधात उतरणार ही चांगली गोष्ट आहे. समृद्धी महामार्ग हा मुर्खपणाचा कळस आहे. मात्र या आंदोलनात वेगवेगळे लढू.", असेही राजू शेट्टी म्हणाले. ...तर सरकारमध्ये राहायचं की नाही, याचा निर्णय घेऊ : शेट्टी "सरकारला एक महिन्याचा अल्टीमेटम देत आहोत. त्यानंतर आंदोलन उग्र होईल. कर्जमाफी झाली नाहीतर एका महिन्यानंतर कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमध्ये राहायचं की नाही याचा निर्णय घेऊ.", असे म्हणत राजू शेट्टींनी सरकारला इशारा दिला आहे. संबंधित बातमी :