Raju Shetti on Jalinder Supekar : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यानंतर रडारवर आलेल्या जालिंदर सुपेकर यांचा कारनामा दिवसागणिक उघड होत चालला आहे. त्यांच्याकडून झालेल्या कोटीच्या कोटी उड्डाणांची चर्चा होत असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा आता जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोघांनी मिळून बाराशे रुपयांची काजू कतली दिवाळी फराळच्या नावाखाली कैद्यांना खायला घातली. मात्र, ती काही त्यांनी खाल्लीच नाही. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास 40 ते 60 टक्के तफावत होती, असा गंभीर आरोप केला आहे.  

राजू शेट्टी यांनी राज्यातील जेलमध्ये होत असलेल्या रेशनिंग आणि कॅन्टीन साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले आहे. राजू शेट्टी यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करत जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पोस्ट करत म्हटले आहे की दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी 1200 रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही.  

रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला

त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राज्यात कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिकाऱ्यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम ,काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास 40 ते 60 टक्के तफावत होती. 

कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही

गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास 5 कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोपांची मालिका

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) (Special IG Prisons) या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती कारागृत बंदिस्त कारागृहात असणाऱ्या एका कैद्याकडून तब्बल 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कैद्याने आपल्या वकिलांमार्फत तक्रार केली आहे. दुसरीकडे, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध समोर आल्यानंतर जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर यांची विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावरून आता पदावनती करत उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या